28
येशूचे पुनरूत्थान

1 शब्बाथ दिवस समाप्त झाल्यानंतर, रविवारी मोठ्या पहाटेस, मग्दाला ह्या गावाची मरीया आणि दुसरी मरीया येशूच्या कबरेला पाहण्यासाठी गेल्या. 2 अचानक तेथे एक शक्तिशाली भूकंप झाला. त्याच वेळेस स्वर्गातून देवापासून एक देवदूत तेथे आला. तो कबरे जवळ गेला आणि त्याच्या प्रवेशद्वारावर ठेवलेला दगड त्याने बाजूला लोटला. आणि मग तो त्या दगडावर बसला.

3 त्याचे शरीर विजेसारखे चकाकत होते, आणि त्याचे कपडे बर्फासारखे अतिशय शुभ्र होते. 4 राखण करणारे रक्षक थरथर कापू लागले, कारण ते सर्व फार घाबरले होते, आणि ते मेलेल्या मनुष्यासारखे खाली पडले.

5 देवदूताने त्या दोन स्त्रियांना म्हटले, “तुम्ही घाबरू नये! मला हे ठाऊक आहे की ज्या येशूला वधस्तंभावर खिळले होते, त्याला तुम्ही शोधत आहात. 6 तो येथे नाही! येशूने जसे सांगितले होते, त्याचप्रमाणे देवाने त्याला पुन्हा जिवंत केले आहे! त्याचे शरीर ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते ती जागा पाहा आत या! 7 आणि मग लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा, ‘तो मेलेल्या मधून पुन्हा जिवंत झाला आहे! तो तुमच्यासमोर गालील जिल्ह्यामध्ये जाणार आहे. तुम्ही तेथे त्याला पाहाल.’ मी तुम्हाला जे काही सांगितले आहे त्याच्याकडे लक्ष द्या!”

8 मग त्या स्त्रिया कबरेपासून लवकर निघून गेल्या. त्या घाबरलेल्या होत्या, परंतु त्यांना अतिशय आनंद देखील झाला होता. जे काही घडले होते ते शिष्यांना सांगण्यासाठी त्या पळत गेल्या. 9 अचानक, त्या धावत असतांना, येशू त्यांच्यासमोर प्रकट झाला. तो त्यांना म्हणाला, “तुम्हास शांती असो!” त्या स्त्रिया त्याच्या जवळ गेल्या. त्यांनी गुडघे टेकले आणि त्याच्या पायांना धरले आणि त्याची उपासना केली. 10 मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही घाबरू नका! जा आणि माझ्या सर्व शिष्यांना सांगा की त्यांनी गालीलात जावे. ते मला तेथे पाहतील.”

11 त्या स्त्रिया जात असतांना, कबरेची राखण करणारे काही सैनिकही शहरामध्ये गेले. जे घडले होते ते सर्वकाही त्यांनी मुख्य याजकांना कळवले. 12 ह्यामुळे सर्व मुख्य याजक आणि यहूदी पुढारी एकत्र जमा झाले. ती कबर रिकामी का आहे ह्याचे स्पष्टीकरण सांगण्याच्या मार्गाविषयी ते विचार करत होते. त्यांनी त्या सैनिकांना लाच म्हणून खूप पैसे दिले. 13 ते म्हणाले, “लोकांना सांगा, ‘रात्रीच्या वेळीस त्याचे शिष्य आले आणि आम्ही झोपलेले असतांना त्यांनी त्याचे शरीर चोरून गेले.’

14 आम्ही तुम्हाला ह्याची खात्री देतो की, जर ही बातमी राज्यपालाने ऐकली तर तो तुमच्यावर रागवणार नाही व ह्याची तुम्हाला शिक्षा करणार नाही. म्हणून तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज नाही.” 15 म्हणून सैनिकांनी ते पैसे घेतले आणि त्यांना सांगितल्या प्रमाणे त्यांनी केले. आणि मी हे पुस्तक लिहिण्याच्या दिवसापर्यंत यहूदी लोकांमध्ये हीच गोष्ट सांगितली जात आहे.
येशूचे गालीलात प्रेषितांना दर्शन

16 नंतर ते अकरा शिष्य गालील जिल्ह्यात गेले. येशूने त्यांना ज्या डोंगरावर जाण्यास सांगितले होते तेथे ते गेले. 17 त्यांनी त्याला तेथे पाहिले आणि त्याची उपासना केली. परंतु तो खरोखरच येशू आहे आणि पुन्हा तो जिवंत झाला आहे ह्याबद्दल काही जणांना संशय आला.

18 आणि मग येशू त्यांच्याजवळ आला आणि त्यांना म्हणाला, “स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर माझ्या पित्याने मला सर्वांवर आणि सर्व गोष्टींवर अधिकार दिला आहे. 19 म्हणून तुम्ही जा, आणि माझ्या अधिकाराचा उपयोग करून सर्व लोक गटांमधील सर्व लोकांनी माझे शिष्य बनावे म्हणून माझा संदेश तुम्ही त्यांना शिकवा. माझ्या पित्याच्या, मी जो त्याचा पुत्र, त्या माझ्या आणि पवित्र आत्म्याच्या अधिकाराखाली त्यांनी असावे म्हणून तुम्ही त्यांना बाप्तिस्मा द्या.

20 मी तुम्हाला जे काही आज्ञा देऊन सांगितले आहे त्या सर्व गोष्टी त्यांना शिकवून पाळावयास सांगा आणि ह्या युगाच्या अंतापर्यंत, मी सदैव तुम्हासोबत राहणार आहे हे लक्षात ठेवा.”