27
रोमी सुभेदार पिलात ह्याच्यासमोर येशू

1 येशूचा वध करण्यासाठी रोमन शासनाला कसे पटवून द्यावे यासाठी मोठ्या पहाटे सर्वच मुख्य याजकांनी आणि यहूदी वडिलांनी याचा निर्णय घेतला. 2 मग त्यांनी त्याचे हात बांधले आणि ते त्याला रोमी राज्यपाल पिलात याच्याकडे घेऊन गेले.

यहूदाचा मुत्यू

3 मग यहूदा, ज्याने येशूचा विश्वासघात केला होता, त्याला हे जाणवले की त्यांनी येशूला ठार करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून त्याने जे काही केले होते त्याविषयी आपले मन बदलले. त्याने ती चांदीची तीस मोहरे घेतली आणि पुन्हा त्या सर्व मुख्य याजकांकडे आणि वडिलांकडे गेला. 4 तो म्हणाला, “मी पाप केले आहे. मी एका निर्दोष मनुष्याला विश्वासघाताने पकडून दिले आहे.” त्यांनी त्याला उत्तर दिले, “त्याच्याशी आमचे काही घेणे देणे नाही! ही तुझी समस्या आहे!” 5 म्हणून यहूदाने ते पैसे घेतले आणि मंदिराच्या अंगणामध्ये ते फेकून दिले. मग तो तेथून निघून गेला आणि त्याने जाऊन स्वतःला गळफास लावून घेतला.

6 नंतर त्या मुख्य याजकांना ते मोहरे सापडली. त्यांनी ती सगळी गोळा केली आणि ते म्हणाले, “एखाद्या मनुष्याने मरावे म्हणून आम्ही हा पैसा दिला होता, आणि आमच्या नियम शास्त्राप्रमाणे मंदिराच्या खजिन्यात हा पैसा टाकावा याची आम्हाला परवानगी नाही.” 7 म्हणून त्यांनी त्या पैशाचा उपयोग एक शेत विकत घेण्यासाठी केला त्या शेताचे नाव कुंभाराचे शेत असे होते. यरुशलेममध्ये जे अनोळखी लोक मरण पावत होते त्यांना पुरण्याच्या जागेसाठी म्हणून त्यांनी त्या शेताचा उपयोग केला. 8 म्हणून त्या शेताला आजच्या दिवसापर्यंत “रक्ताचे शेत” असे म्हटले जाते.

9 यिर्मया संदेष्ट्याने फार पूर्वी जे शब्द लिहून ठेवले होते, ते त्यांच्या या शेताच्या विकत घेण्यामुळे खरे ठरले: “त्यांनी तीस चांदीच्या मोहरा घेतल्या त्याची किंमत इस्राएलाच्या पुढाऱ्यांच्या नजरेमध्ये एवढीच होती. 10 आणि त्या पैशाने त्यांनी एक कुंभाराचे शेत विकत घेतले. प्रभूने मला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी तसे केले.”
येशूची चौकशी

11 मग येशू त्या राज्यपालाच्या समोर जाऊन उभा राहिला. राज्यपालाने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहे असे तू म्हणतोस का?” येशूने त्याला उत्तर दिले, “होय, तू जे आताच बोलला त्याप्रमाणे ते आहे.”

12 परंतु जेव्हा मुख्य याजकांनी आणि इतर वडिलांनी येशूवर वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी करण्याचा आरोप ठेवला तेव्हा त्याने त्यांना कसल्याही प्रकारे उत्तर दिले नाही. 13 म्हणून पिलाताने त्याला म्हटले, “ते तुझ्यावर कसल्या प्रकारचे आरोप लावतात ते तुला ऐकू येते काय? त्यांना कोणतेही प्रत्युत्तर देणार नाहीस काय?” 14 परंतु येशूने काहीही म्हटले नाही. ते त्याच्यावर ज्या सर्व गोष्टींचा आरोप करत होते त्यापैकी कुठल्याही दोषाला त्याने उत्तर दिले नाही. यामुळे राज्यपालाला खूप आश्चर्य वाटले.

15 वल्हांडणाचा सण साजरा करण्याच्या दिवसांमध्ये राज्यपालाची अशी रीत होती की तुरूंगात अटक केलेल्या एका व्यक्तीला तो सुटका देत असे. लोक ज्याच्याविषयी विनंती करत असत त्या व्यक्तीला तो सुटका देत असे. 16 त्यावेळेस यरुशलेमेमध्ये एक प्रसिद्ध असा कैदी होता त्याचे नाव बरब्बा असे होते.

17 म्हणून जेव्हा लोकांची गर्दी जमा झाली, पिलाताने त्यांना विचारले, “मी तुमच्यासाठी कोणता कैदी सोडू असे तुम्हाला वाटते: बरब्बाला, किंवा ज्याला तुम्ही ख्रिस्त म्हणता त्या येशूला?” 18 त्याने त्यांना असा प्रश्न विचारला कारण मुख्य याजकांनी येशूला त्याच्याकडे आणले होते यामागे ते येशूविषयी मत्सर करत होते अशी जाणीव राज्यपालास झाली होती. आणि पिलाताला असे वाटले की कदाचित लोक येशूला सोडविण्यासाठी प्राधान्य देतील.

19 पिलात न्यायासणाच्या सिंहासनावर बसलेला असतांना, त्याच्या पत्नीने त्याच्याकडे एक संदेश पाठवला: “ह्या मनुष्यामुळे आज मोठ्या पहाटेस मला एक विचित्र स्वप्न पडले आहे. म्हणून तू त्या नीतिमान मनुष्याला दोषी ठरवू नकोस, व मृत्युदंड देऊ नको!”

20 परंतु मुख्य याजकांनी आणि वडिलांनी पिलाताने बरब्बाला सोडावे, आणि येशूला ठार करण्याची आज्ञा द्यावी असे लोकांचे मन वळवले. 21 म्हणून राज्यपालाने त्यांना विचारले, “तुम्हासाठी मी या दोन पुरुषांपैकी कोणाला सोडावे?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “बरब्बा!” 22 हे ऐकून पिलात आश्चर्यचकित झाला, आणि त्याने विचारले, “तुम्हापैकी काही लोक ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशू विषयी मी काय करावे?” त्या सर्वांनी त्याला उत्तर दिले, “तुझ्या सैनिकांनी त्याला वधस्तंभावर खिळावे अशी त्यांना आज्ञा कर!”

23 पिलाताने उत्तर दिले, “का? त्याने कोणता गुन्हा केला आहे?” परंतु ते अधिकच मोठ्याने ओरडले, “त्याला वधस्तंभावर द्या!”

24 पिलातालाही जाणीव झाली की त्याच्याने काही साध्य होत नव्हते. त्याच्या हे लक्षात आले की लोक दंगल करण्यास सुरवात करत होते. म्हणून त्याने पाण्याने भरलेले एक पात्र घेतले आणि गर्दी त्याच्याकडे पाहत असतांना त्याने आपले हात धुतले. तो म्हणाला, “मी माझे हात धुण्यावरून तुम्हाला हे दाखवून देत आहे की, जर हा मनुष्य मेला, तर तो माझा दोष नाही!”

25 आणि सर्व लोकांनी त्याला उत्तर दिले, “त्याच्या मरणासाठी आम्ही दोषी ठरू आणि आमचे मूलबाळ देखील दोषी ठरावेत!” 26 मग त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडावे अशी त्याने त्याच्या सैनिकांना आज्ञा दिली. परंतु त्यांनी येशूला फटके मारावे अशी त्याने सैनिकांना आज्ञा दिली. आणि मग त्याने येशूला त्याच्या सैनिकांच्या हातात दिले ते येशूला वधस्तंभावर खिळणार होते.
येशूला वधस्तंभावर खिळतात

27 राज्यपालाच्या सैनिकांनी येशूला धरले आणि सैनिकांच्या बराकीमध्ये नेले. तेथे त्याच्याभोवती सैनिकांची संपूर्ण तुकडी जमा झाली. 28 त्यांनी त्याचे कपडे ओढून काढले, आणि तो राजा असल्यासारखे ते त्याच्यासमोर नाटक करू लागले, आणि त्यांनी त्याच्यावर लाल रंगाचे एक राजकीय वस्त्र पांघरले. 29 त्यांनी काटे असलेल्या काही झाडांच्या फांद्या घेतल्या आणि त्यांना एकत्र गुंफून त्यांनी त्याचा एक मुकूट तयार केला व तो त्यांनी त्याच्या डोक्यावर ठेवला. त्यांनी त्याच्या उजव्या हातामध्ये राजाच्या हातात असते तशी एक राजदंड सारखी काठी त्याच्या हातात दिली. आणि मग त्यांनी त्याच्यासमोर नमन केले आणि असे म्हणून त्याची थट्टा उडवली, “हे यहूदाच्या राजा तू चिरायू असो!”

30 ते त्याच्यावर थुकंत राहिले. त्यांनी काठी घेतली आणि त्यांनी त्याच्या डोक्यावर मारले. 31 त्यांनी त्याची थट्टा करणे थांबवल्यावर, त्याच्या अंगावर घातलेले वस्त्र त्यांनी काढून घेतले आणि त्याचे कपडे त्यांनी त्याला पुन्हा घातले. मग ज्या ठिकाणी ते त्याला वधस्तंभावर खिळणार होते त्या ठिकाणाकडे ते त्याला घेऊन जाऊ लागले.

32 येशूने त्याचा वधस्तंभ थोडे अंतर घेऊन गेल्यानंतर, शिमोन नावाचा एक मनुष्य सैनिकांच्या दृष्टीस पडला, तो कुरेने नावाच्या शहरातील होता. त्याने येशूचा वधस्तंभ उचलून न्यावा अशी सैनिकांनी त्याच्यावर जबरदस्ती केली. 33 गुलगुथा नावाच्या एका ठिकाणावर ते आले. या नावाचा अर्थ ‘कवटी सारखी एक जागा.’ असा होतो. 34 ते तेथे पोहचले, तेव्हा त्यांनी द्राक्षरसामध्ये अतिशय कडू अशा चवीचा एक पदार्थ मिसळला. येशूला वधस्तंभावर खिळत असतांना त्याला जास्त वेदना होऊ नये म्हणून त्यांनी तो येशूला पिण्यासाठी दिला. परंतु त्याची चव घेतल्यावर त्याने तो पिण्यास नकार दिला. काही सैनिकांनी त्याचे कपडे घेतले.

35 मग त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. त्यानंतर, येशूच्या वस्त्राचा कोणता भाग कोणाला मिळावा हे ठरवण्यासाठी त्यांनी आपआपसामध्ये चिठ्ठ्या टाकल्यासारखा एक खेळ खेळला आणि त्याची वस्त्रे त्यांनी आपसात वाटून घेतली. 36 मग सैनिक तेथे त्याचे रक्षण करण्यासाठी बसले, कोणी येऊन त्याला तेथून काढून घेऊ नये म्हणून ते त्या ठिकाणी थांबले होते. 37 ते येशूला वधस्तंभावर का खिळत होते ह्याचे कारण लिहिलेली एक पाटी त्यांनी येशूच्या वर वधस्तंभावर खिळली होती. परंतु त्या पाटीवर केवळ एवढेच लिहिले होते, ‘हा येशू आहे. यहूद्यांचा राजा.’

38 आजूबाजूच्या वधस्तंभावर त्यांनी आणखी दोन चोरांनाही खिळले होते. त्यांनी एक वधस्तंभ येशूच्या डावीकडे आणि दुसरा वधस्तंभ येशूच्या उजवीकडे रोवलेला होता. 39 येशू एखादा दुष्ट व्यक्ती असल्याप्रमाणे त्याच्या जवळून जाणारे लोक त्याचा अपमान करून आपले डोके हलवत होते. 40 ते असे म्हणत होते, “तू मंदिराचा सर्वनाश करून ते तीन दिवसात पुन्हा उभारशील असे म्हणाला होतास! जर तू ते करण्यास समर्थ आहेत तर तू नक्कीच स्वतःलाही वाचवू शकतोस! जर तू देवाचा पुत्र आहेस तर, वधस्तंभावरून खाली उतरून ये!”

41 अशाच प्रकारे, मुख्य याजकांनी, यहूदी नियम शास्त्र शिकवणार्‍या पुरुषांनी, आणि वडीलजणांनी त्याची थट्टा केली. ते अशा प्रकारे बोलत होते, 42 “ह्याने असा दावा केला आहे की, तो आजारी लोकांना बरा करणारा आहे, परंतु तो स्वतःला मात्र मदत करू शकत नाही!” “तो म्हणतो की तो इस्राएलाचा राजा आहे. तर त्याने वधस्तंभावरून खाली उतरून घ्यावे. मगच आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू!”

43 “तो देवावर विश्वास ठेवतो असा दावा करणारा आहे, एवढेच नव्हे तर तो असा एक मनुष्य आहे जो देव देखील आहे असेही म्हणतो. म्हणून जर देव त्याच्यावर प्रसन्न आहे, तर देवाने त्याला आता येथून सोडवावे!” 44 आणि जे दोन दरोडेखोर त्याच्यासोबत वधस्तंभी खिळलेले होते त्यांनीही त्याची अशाच प्रकारे थट्टा केली, आणि तेही अशाच गोष्टी त्याच्याशी बोलले.
येशूचा मुत्यू

45 दुपारच्या वेळी संपूर्ण देशावर अंधकार पसरला. दुपारच्या तीन वाजेपर्यंत तेथे अंधार राहिला. 46 तीन वाजन्याच्या सुमारास येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, “एली, एली, लमा सबखथनी” याचा अर्थ असा होतो, “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला आहेस?” 47 तेथे उभ्या असलेल्या काही लोकांनी जेव्हा “एली,” हा शब्द ऐकला, तेव्हा त्यांनी असा विचार केला की तो एलिया संदेष्ट्याला हाक मारत आहे.

48 लगेचच त्यांच्यापैकी एक व्यक्ती धावत गेला आणि त्याने एक स्पंज घेतला. कडू द्राक्षरसाने त्याने तो भरला. मग त्याने तो स्पंज काठीच्या टोकावर लावला आणि येशूच्या तोंडाजवळ धरला जेणेकरून येशूने त्यातील द्राक्षरस प्यावा. 49 परंतु तेथील इतर लोक म्हणाले, “थांबा! एलिया संदेष्टा ह्याला वाचवण्यासाठी येतो का ते आपण पाहू या!” 50 मग त्यानंतर येशूने पुन्हा एकदा मोठ्याने आरोळी मारली, आणि त्याने आपला आत्मा देवाच्या स्वाधीन केला, व तो मरण पावला.

51 त्याच क्षणी मंदिरातील परम पवित्र स्थान वेगळा करणारा जाड पडदा वर पासून खाल पर्यंत मधोमध फाटला व त्याचे दोन भाग झाले. तेव्हा पृथ्वी हालली आणि काही मोठे खडक दुभंगले गेले. 52 काही कबरा उघडल्या गेल्या, आणि ज्यांनी देवाला सन्मान देणारे जीवन जगले होते अशा अनेक लोकांची शरीरे पुन्‍हा जिवंत झाली. 53 ते कबरांमधून बाहेर पडले, आणि येशू पुन्हा जिवंत झाल्यानंतर, ते यरुशलेमेमध्ये गेले आणि त्यांनी अनेक लोकांना दर्शन दिले.

54 येशूला ज्या सैनिकांनी वधस्तंभावर खिळले होते त्या सैनिकांवर देखरेख करणारा अधिकारी तेथेच बाजूला उभा होता. वधस्तंभावर देखरेख करणारे आणि त्यांचे रक्षण करणारे सैनिकही तेथे उभे होते. जेव्हा त्यांना भूमिकंप झाल्याची जाणिव झाली आणि त्यांनी इतर घडलेल्या गोष्टी पाहिल्या, ते अतिशय भयभीत झाले. त्यांनी आश्चर्य व्यक्त केले, “खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता!”

55 तेथे अनेक स्त्रियाही होत्या. त्या थोड्या अंतरावरून ह्या सर्व गोष्टी पाहत होत्या. त्याला लागेल त्या गोष्टींची पुर्तता त्यांनी करावी म्हणून त्या गालील प्रांताहून येशूच्यासोबत येथपर्यंत आल्या होत्या. 56 या स्त्रियांमध्ये मग्दाला येथील मरीया, दुसरी मरीया जी याकोब आणि योसेफ ह्यांची आई होती, आणि याकोब आणि योहान यांची आई त्यामध्ये होत्या.
येशूची उत्तरक्रिया

57 मग जवळ जवळ संध्याकाळ झाल्यानंतर, योसेफ नामक एक श्रीमंत मनुष्य तेथे आला. तो अरिमथाई या नावाच्या गावातला होता. तो देखील येशूचा शिष्य होता. 58 तो पिलाताकडे गेला आणि येशूचे शरीर त्याने पिलाताला मागितले व त्याला पुरण्याची परवानगीही मागितली. पिलाताने त्याच्या सैनिकांना आज्ञा केली की त्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे.

59 म्हणून योसेफ आणि इतर लोकांनी त्याचे शरीर घेतले आणि ते एका स्वच्छ व पांढऱ्या शुभ्र कापडामध्ये गुंडाळले. 60 योसेफाची स्वतःची कबर जी कामकऱ्यांनी एका खडकामध्ये कोरून काढली होती त्या नव्या कबरेत त्यांनी त्याला ठेवले. त्या कबरीच्या तोंडाशी त्यांनी एक मोठा गोल धोंडा ढकलून ठेवला. मग ते तेथून निघून गेले. 61 मग्दाला या गावाची मरीया आणि दुसरी मरीया त्या कबरीच्या विरुद्ध दिशेस बसून, ह्या सर्व गोष्टी पाहत होत्या.

62 दुसरा दिवस शनिवार असल्यामुळे, तो यहूद्यांचा विसावा घेण्याचा दिवस होता. सर्व मुख्य याजक आणि काही परूशी पिलाताकडे गेले. 63 ते म्हणाले, “महाशय, आम्हाला हे आठवते की तो ठग जिवंत असतांना, असे म्हणत असे, ‘मी मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होईन.’ 64 म्हणून आम्ही तुला विनंती करतो की तू आपल्या सैनिकांनी त्या कबरेची तीन दिवसापर्यंत राखण करावी अशी त्यांना आज्ञा द्या. जर तू असे केले नाहीस तर त्याचे शिष्य येतील आणि त्याचे शरीर चोरून नेतील. मग ते सर्व लोकांना जाऊन सांगतील तो मेलेल्यामधून पुन्हा जिवंत झाला आहे. जर त्यांनी लोकांना ह्या गोष्टी सांगून फसवले, तर आधी तो मी ख्रिस्त आहे असे सांगून लोकांना त्याने आधीच फसवले होते त्याही पेक्षा ही दुसरी फसवणूक अतिशय भयंकर असेल.”

65 पिलाताने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही काही सैनिक घेऊन जाऊ शकता. त्या कबरेकडे जा आणि तुम्हाला ठाऊक असल्याप्रमाणे तिला तुम्ही सुरक्षित करा.” 66 म्हणून ते गेले आणि त्यांनी त्या कबरीच्या धोंड्यावर दोऱ्या बांधून त्याचे तोंड बंद केले आणि त्या दगडी कपारीच्या दोन्ही बाजूला त्यांनी रोमी सैनिकाचा शिक्का मारला. त्या कबरेचे राखण करण्यासाठी त्यांनी तेथे काही सैनिकांनाही ठेवले.