24
मंदिराची धूळधाण व युगाची समाप्ती ह्याविषयीचे येशूचे भविष्य

1 मग येशू मंदिराच्या अंगणातून निघून गेला. तो तेथून चालत जात असता, त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्या मंदिराची इमारत किती सुंदर आहे याविषयी ते त्याच्याशी बोलू लागले. 2 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही ज्या इमारती पाहत आहात त्याविषयी मला तुम्हाला सत्य सांगायचे आहे: एक सैन्य त्यांना पूर्णपणे नष्ट करणार आहे. या इमारतीवरील प्रत्येक दगड ते काढून फेकून देतील. एक दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही असे ते करतील.”

3 त्यानंतर, जेव्हा येशू जैतून डोंगराच्या उतारावर एकटाच बसला होता, शिष्य त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी त्याला विचारले, “मंदिराच्या इमारती सोबत त्या घटना केव्हा घडतील? आणि ह्या जगाचा अंत होणार आहे, आणि तू पुन्हा परत येणार आहेस हे दिसावे म्हणून कोणत्या गोष्टी घडणार आहेत?”

4 येशूने उत्तर दिले, “काय घडणार आहे याविषयी तुम्हाला कोणीही फसवू नये, याची खात्री बाळगा एवढेच मी तुम्हाला सांगेन! 5 अनेक लोक येतील आणि तो मीच आहे असे तुम्हाला सांगतील. होय, ते खरोखर असे म्हणतील, ‘मी ख्रिस्त आहे,’ आणि ते अनेक लोकांना फसवतील.

6 जवळपासच्या युद्धांच्या बातम्या तुम्ही ऐकाल तसेच दूरवरच्या युद्धांविषयी ही तुमच्या कानावर बातमी पडेल, परंतु त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. ह्या गोष्टी घडणे अवश्यक आहे असे देवाने सांगितले हे तुम्ही सदैव लक्षात ठेवा. परंतु ह्या घटना घडतील, तेव्हा जगाचा अंत आला आहे असा त्याचा अर्थ होणार नाही! 7 वेगवेगळ्या लोकांचे गट एकमेकांवर हल्ला करतील, आणि राजे एकमेकांवर चाल करून जाण्यासाठी आपापल्या सैन्याचे नेतृत्व करतील. पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी दुष्काळ आणि भूमिकंप होतील. 8 या सर्व गोष्टी अगोदर घडतील, परंतु एखादी स्त्री एका बाळाला जन्म देत असते तेव्हा तिच्या वेदनांची सुरूवात होते तशाच प्रकारे हे असेल.

9 यापेक्षा अधिक वाईट गोष्टी घडणार आहेत. जे लोक तुमचा विरोध करतात ते तुम्हाला ठार करावे व छळावे म्हणून धरून नेतील. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून वेगवेगळ्या गटातील लोक तुमचा तिरस्कार करतील. 10 माझ्यावर विश्वास ठेवणारे अनेक लोक देखील, त्यांचा छळ झाल्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवणे बंद करतील. ते त्यांच्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यांचा विश्वास घात करतील आणि एकमेकांचा तिरस्कार करतील. 11 अनेक लोक ‘मी संदेष्टा आहे’ असे म्हणत येतील आणि मात्र ते खोटे बोलतील व त्यामुळे अनेक लोक फसवले जातील.

12 देवाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे, अनेक विश्वासणारे देखील एकमेकांवर प्रीती करणार नाहीत. 13 परंतु जे विश्वासणारे त्यांच्या जीवनाच्या शेवटपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवत राहतील, त्या सर्वांना देव तारेल. 14 शिवाय, जगाच्या प्रत्येक भागामध्ये विश्वासणारे जातील आणि देव जगाच्या प्रत्येक भागातील लोकांवर राज्य करण्याची सुरूवात कशी करणार आहे, याविषयीच्या आनंदाच्या बातमीचा प्रचार करतील आणि ते सर्व लोक गटांपर्यंत ही बातमी नेतील. त्यानंतर जगाचा अंत येईल.”

15 “परंतु जगाचा अंत होण्याच्या अगोदर, पवित्र मंदिराला अशुद्ध करणारा आणि लोकांनी मंदिर सोडून द्यावे म्हणून कारणीभूत असणारा अमंगळ व्यक्ती मंदिरामध्ये उभा राहील. याविषयी दानिएल संदेष्टा फार पूर्वी बोलला होता आणि त्याने लिहूनही ठेवले होते. मी तुम्हाला इशारा देत आहे, म्हणून ह्याविषयी आता जो कोणी वाचत आहे त्याने याकडे विशेष लक्ष द्यावे. 16 मंदिरामध्ये ही घटना घडतांना तुम्ही पाहाल, तेव्हा यहूदी या प्रांतात राहणाऱ्या सर्वांनी डोंगरांकडे पळून जावे! 17 पळून जाण्या अगोदर आपल्या घरातून काही वस्तू घेण्यासाठी मैदानामधील लोकांनी पुन्हा आपल्या घरांकडे परत जाऊ नये. 18 जे लोक शेतामध्ये काम करत असतील त्यांनी घरामधून आपली अंगरखे घेण्यासाठी परत फिरू नये.

19 त्या काळामध्ये ज्या स्त्रिया गर्भवती असतील त्यांना किती कष्ट होतील, आणि ज्या लहान लेकरांना पाजणाऱ्या असतील त्यांना दुःख सहन करावे लागेल, कारण त्यांच्यासाठी तेथून पळून जाणे खरोखर अवघड होईल! 20 प्रार्थना करा की तुमचे पळून जाणे हिवाळ्यामध्ये होऊ नये कारण तेव्हा प्रवास करणे तुम्हाला कठीण होईल, तसेच ही घटना शब्बाथ दिवशी विसाव्याच्या दिवशी घडू नये म्हणून प्रार्थना करा; 21 कारण ह्या घटना घडतील तेव्हा लोकांना फार त्रासाला सामोरे जावे लागेल. देवाने हे जग निर्माण केले तेव्हापासून आतापर्यंत इतक्या मोठ्या संकटाचा सामना कोणालाही करावा लागला नाही, आणि पुढेही एवढे मोठे संकट कोणावर येणार नाही असे हे संकट असणार आहे. 22 लोकांना ज्या संकटाचा सामना करावा लागेल याची वेळ जर देवाने कमी केली नसती, तर प्रत्येक जण मरण पावला असता, परंतु त्याने त्याची वेळ कमी करण्याचे ठरवले आहे कारण ज्या लोकांना त्याने निवडले आहे त्यांच्याविषयी त्याला काळजी वाटते.”

23-24 “त्यावेळेस लोक असे म्हणतील मी तो आहे, मी ख्रिस्त आहे, किंवा ते देवापासून आलेले खरे संदेष्टे आहेत असे म्हणत प्रकट होतील. ते वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह व चमत्कार करतील आणि अद्भुत गोष्टी करतील, जेणेकरून लोकांना फसवावे. देवाने निवडलेल्या तुम्हा लोकांनाही फसवावे म्हणून ते प्रयत्न करतील. म्हणून त्यावेळेस, जर कोणी तुम्हाला असे म्हटले, ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे!’ किंवा कुणी म्हणेल, ख्रिस्त तेथे आहे, तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका!’ 25 ह्या गोष्टी घडण्याच्या अगोदरच मी यांच्याविषयी तुम्हाला इशारा देऊन ठेवला आहे हे तुम्ही विसरू नये.

26 जर कोणी तुम्हाला असे म्हटले, ‘पाहा, ख्रिस्त त्या रानात आहे!’ तर तुम्ही तेथे जाऊ नका. तसेच, जर कोणी तुम्हाला असे म्हटले, ‘पाहा, ख्रिस्त त्या गुप्त खोली मध्ये आहे!’ तर तुम्ही त्या व्यक्तीवर देखील विश्वास ठेवू नये. 27 कारण जेव्हा वीज चकाकते तेव्हा ती पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्व लोकांच्या दृष्टीस पडते, अगदी तशाच प्रकारे, जेव्हा मी, मनुष्याचा पुत्र, परत येईन तेव्हा प्रत्येकजण मला पाहील. 28 मी पुन्हा परतेन, तेव्हा ते सर्वांना स्पष्टपणे दिसणारे असेल; जेव्हा आपल्याला गिधाडे आकाशामध्ये फिरताना दिसतात, तेव्हा तेथे एखादा मेलेले जनावर असेल हे आपल्याला कळते तशाप्रमाणे हे होईल.”

29 “लोकांनी त्या दिवसांमध्ये संकटाचा सामना केल्यानंतर, संपूर्ण सृष्टी अंधकारमय होईल. सूर्य अंधकारमय होईल. चंद्र प्रकाश देणार नाही. तारे आकाशातून खाली पडतील. आणि देव आकाशाला हलवेल आणि सर्व गोष्टी त्यांच्या ठिकाणाहून हालतील.

30 त्यानंतर, मी, मनुष्याचा पुत्र, पुन्हा पृथ्वीवर परत येत आहे हे दर्शवणारे चिन्ह सर्वजणांना आकाशामध्ये दृष्टीस पडेल. तेव्हा सर्व लोकांच्या गटातील जे लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत ते विलाप करतील कारण देव त्यांना शिक्षा करणार आहे याविषयी ते घाबरलेले असतील. मी पृथ्वीवर परत येईन तेव्हा सामर्थ्याने व मोठ्या गौरवाने ढगांवर बसून परत येताना, मला म्हणजे, मनुष्याच्या पुत्राला ते पाहतील. 31 मी स्वर्गातून माझ्या स्वर्गदूतांना पृथ्वीवर सगळीकडे पाठवेन. ते मोठ-मोठ्याने तुतारी वाजवतील. मग मी लोकांना निवडले आहे त्यांना ते संपूर्ण पृथ्वीवरून एकत्र करतील.”
जागृतीची आवश्यकता

32 “अंजिराचे झाड याप्रमाणे वाढते याविषयी असलेल्या बोधकथेतून काही गोष्टींचा अर्थ तुम्ही समजून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. अंजिराच्या एका झाडाच्या फांद्या नाजूक असतात आणि त्याला पालवी फुटण्यास सुरू होते, तेव्हा उन्हाळा जवळ आला आहे असे तुम्हाला समजू लागते. 33 त्याचप्रमाणे, मी तुम्हाला आता समजावून सांगितलेल्या सर्व गोष्टी घडतांना तुम्ही पाहाल, त्यावेळेस तुम्हाला ही कळेल की माझे परत येणे जवळ आले आहे.

34 या गोष्टी लक्षात ठेवा: मी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या ज्या लोकांनी पाहिल्या ते मरण पावल्यानंतरच हे सगळे काही घडेल. 35 ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या निश्चितच घडतील ह्याची तुम्ही नक्की खात्री बाळगा. एकेदिवशी पृथ्वी आणि आकाश अदृश्य होईल, परंतु मी जे तुम्हाला सांगितले आहे ते नेहमीच खरे ठरेल.”

36 “परंतु मी ज्या गोष्टी घडतील असे तुम्हाला सांगितले आहे त्या घडण्याची वेळ मला, किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला, किंवा स्वर्गातील एखाद्या देवदूताला, तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. केवळ माझ्या पित्याला ते माहित आहे.

37-39 नोहा जिवंत असतांना जसे घडले तसेच ते असेल. महापूर येईपर्यंत, त्याच्यांसोबत काहीतरी वाईट होणार आहे याची जाणिव त्या लोकांना झाली नव्हती. ते नेहमीप्रमाणे जेवण करत होते आणि पीत होते. काही पुरूष लग्न करून घेत होते आणि आई-वडिल आपल्या मुलींचे लग्न पुरुषांसोबत करून देत होते. नोहा आणि त्याचे कुटूंब यांनी त्या मोठ्या नावेत प्रवेश केला त्या दिवसापर्यंत त्यांचे हे कार्य निरंतर चालू होते. आणि त्यानंतर तो महापूर आला आणि जे त्या नावेत नव्हते त्या सर्वांना त्याने बुडवून टाकले. अगदी अशाच प्रकारे, जे अविश्वासणारे लोक मनुष्याचा पुत्र म्हणजे मी कधी येणार यांना माहिती नाही आणि ते मी येण्याची अपेक्षा ही करणार नाहीत.

40 मी परत येईन, तेव्हा मी सर्व लोकांना स्वर्गात वर घेऊन जाणार नाही. माझ्यावर ज्यांनी भरोसा ठेवला आहे केवळ त्यांनाच मी घेऊन जाईन. उदाहरणार्थ, दोन लोक एका शेतात असतील. त्यांच्यापैकी एकाला स्वर्गात वर घेतले जाईल आणि त्याच्या सोबतचा दुसरा व्यक्तीला येथे शिक्षा भोगण्यासाठी सोडून दिले जाईल. 41 अशाच प्रकारे, एका जात्यावर दोन स्त्रिया दळत असतील. त्यापैकी एकीला स्वर्गात घेतले जाईल आणि दुसरीला सोडून दिले जाईल. 42 म्हणून, तुमचा प्रभू म्हणजेच मी, या पृथ्वीवर कोणत्या दिवशी परत येणार हे तुम्हाला ठाऊक नाही, तर मी कोणत्याही वेळेस परत येऊ शकतो म्हणून तुम्ही नेहमी तयार असले पाहिजे.

43 एका घराच्या मालकाला जर माहिती असले की दरोडेखोर रात्री कोणत्या क्षणी येतील, तर तो जागा राहिला असता आणि दरोडेखोरांना त्याने घर फोडू दिले नसते. अशाचप्रकारे, मी देखील एखाद्या चोरासारखा अनपेक्षित रीतीने येईन. 44 मी परत येण्याची तुम्ही अपेक्षा करणार नाही त्यावेळेस मनुष्याचा पुत्र पृथ्वीवर परत येईल म्हणून तुम्ही तयार असण्याची गरज आहे.”
विश्वासू दास व दृष्ट दास ह्यांचा दृष्टान्त

45 “प्रत्येक विश्वास योग्य आणि ज्ञानी सेवक कसा आहे ह्याविषयीचा विचार करा. घरमालकाने एका सेवकाकडे इतर सेवकांवर देखरेख करण्याची जबाबदारी दिली. त्यांना ठरलेल्या वेळेवर जेवण देण्याचे त्याने त्याला सांगितले. त्यानंतर तो एका दूरच्या प्रवासावर निघून गेला. 46 जेव्हा घरमालक त्या प्रवासावरून परत येईल, तेव्हा जर दास तसे करताना त्याला आढळला तर घर मालक त्याच्यावर अतिशय प्रसन्न होईल. 47 याविषयी विचार करा; घर मालक त्या एका दासाला त्याच्या सर्व मालमत्तेवर देखरेख ठेवणारा म्हणून नियुक्त करेल.

48 परंतु एखादा दुष्ट दास स्वतःशीच असे म्हणेल, ‘आता माझा मालक बराच काळासाठी परत येणार नाही त्याला जाऊन बराच वेळ झाला आहे. आणि मी काय करत आहे हे त्याला कळणार ही नाही.’ 49 मग तो त्याच्या सोबतच्या इतर सेवकांना मारहाण करू लागेल. आणि तो खाईल व पिईल आणि जे पितात त्यांच्यासोबत राहील. 50 तो सेवक अपेक्षा करणार नाही अशा वेळेस त्याचा घर मालक परत येईल. 51 तो त्या सेवकाला अतिशय कठोर शिक्षा देईल आणि जेथे ढोंगी लोकांना ठेवले जाते तेथे तो त्याला ठेवेल. त्या ठिकाणी लोक रडतात आणि आपले दात खातात कारण तेथे त्यांना खूप जास्त वेदना होतात.”