23
शास्त्री व परूशी ह्यांचा निषेध

1 त्यानंतर येशूने लोक समुदायाला आणि त्यांच्या शिष्यांना म्हटले, 2 “देवाने मोशेद्वारे इस्राएलाच्या लोकांना दिलेल्या नियम शास्त्राचा अर्थ सांगण्याचे कार्य परूश्यांनी आणि आमच्या यहूदी नियमशास्त्र शिकवणाऱ्यांनी स्वतःकडे घेतले आहे. 3 परिणामी, ते तुम्हाला जे काही करण्यासाठी सांगतात ते तुम्ही अवश्य केले पाहिजे. परंतु ते जे करतात, तसे तुम्ही करू नका कारण ते स्वतःच त्या नियमांचे पालन करत नाहीत.

4 ज्या नियमांचे पालन करणे अवघड आहे अशा अनेक नियमांचे पालन करण्याची ते तुमच्याकडून अपेक्षा करतात. परंतु त्या नियमांचे पालन करण्यासाठी ते स्वतः कोणालाही सहकार्य करत नाहीत. जणू काय त्यांनी खूप वजनदार ओझे बांधून तुमच्या खांद्यांवर ठेवले व तुम्ही ते वाहून न्यावे असे त्यांना वाटते. परंतु तुम्हाला मदत व्हावी म्हणून ते आपले स्वतःचे एक बोट देखील त्या वजनाला लावणार नाहीत. 5 ते जे काही कार्य करतात, ते केवळ ह्यासाठीच करतात की इतर लोकांनी त्यांच्याकडे पाहावे आणि त्यांची स्तुती करावी की ते किती चांगले आहेत. उदाहरणार्थ, आपल्या हातांवर बांधण्यात येणाऱ्या शास्त्र लेखाच्या छोट्या-छोट्या पेट्या त्या वास्तविक पाहता आकाराने मोठ्या बनवून बांधतात. त्यांच्या अंगरख्याला जे गोंडे बांधलेले आहेत त्यांचा आकारही ते मोठा करतात जेणेकरून इतरांनी असा विचार करावा की ते देवाचा कितीतरी सन्मान करणारे आहेत.

6 इतर लोकांनी त्यांचा सन्मान करावा अशी त्यांची इच्छा असते. उदाहरणार्थ, एखाद्या मेजवानीत जेथे अतिशय महत्वाचे लोक बसतात तेथेच तेही बसतात. सभास्थानांमध्येही अशाच प्रकारच्या जागांमध्ये ते बसत असतात. 7 बाजारामध्ये लोकांनी त्यांना अतिशय जास्त सन्मान दाखवून अभिवादन करावे ह्याची त्यांना खूप आवड आहे, आणि लोकांनी त्यांना ‘गुरूजी’ असे म्हणावे हेही त्यांना आवडते.

8 यहूदी शिक्षकांना जसे लोक म्हणतात, तसेच इतर लोकांनी तुम्हालाही ‘गुरुजी’ म्हणावे, याची तुम्ही म्हणजे माझ्या शिष्यांनी परवानगी देऊ नये. केवळ मीच जो तुमचा खरा गुरू आहे: याचा अर्थ असा आहे की, तुम्ही सर्व समान आहात, भाऊ आणि बहिणीसारखे, तुम्ही एकमेकांचे आहात. 9 पृथ्वीवरील कोणालाही ‘पिता’ म्हणून हाक मारू नका, कारण देव, तुमचा पिता जो स्वर्गात आहे, तोच केवळ तुमचा खरा पिता आहे. 10 लोकांनी तुम्हाला ‘गुरुजी’ म्हणावे याची परवानगी देऊ नका, कारण मी, जो ख्रिस्त, केवळ एकच असा तुमचा शिक्षक आहे.

11 त्याऐवजी, सेवक जसा इतरांची सेवा करतो तशीच तुम्ही इतरांची सेवा करावी, तुम्हापैकी जो कोणी देवाच्या दृष्टीने महत्वाचा बनू इच्छितो त्याने असेच करावे. 12 जे कोणी स्वतःला महत्त्वाचे बनवू इच्छितात देव त्यांना विनम्र करतो. आणि जे स्वतःला विनम्र करतात देव त्यांना खरोखर महत्त्वाचे बनवतो.”

13-14 मग येशूने धार्मिक पुढाऱ्यांना म्हटले, “तुम्ही जे नियम शास्त्राचे शिक्षक आहात आणि अहो परूशांनो, तुम्ही ढोंगी आहात! देव तुम्हाला किती भयंकर रीतीने शासन करणार, कारण तुम्ही लोकांनी त्याचा स्वीकार करून त्यांच्यावर राज्य करावे यापासून त्यांना थांबवता. देवाच्या शहरांमध्ये इतरांनी प्रवेश करू नये म्हणून दार बंद करणाऱ्या लोकांसारखे तुम्ही आहात. तुम्हाला स्वतःलाही आत प्रवेश करायचा नाही, आणि तुम्ही इतरांनाही प्रवेश करू देत नाहीत.

15 नियम शास्त्राच्या शिक्षकांनो आणि परूश्यांनो, तुम्ही ढोंगी आहात! देव तुम्हाला किती भयंकर शासन करणार! तुम्ही जे काही शिकवता त्याच्यावर एका व्यक्तीने विश्वास ठेवावा म्हणून तुम्ही कितीतरी कठोर परिश्रम करतात. तुम्ही इतर दूरवरच्या भूमीकडे प्रवास करत जाता आणि समुद्रही ओलांडून ते कार्य करण्यासाठी जाता; आणि ह्याचा परिणाम म्हणून, तुम्ही जे काही शिकवता तेव्हा तो व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही नरकात जाण्यासाठी जेवढे पात्र आहात त्याहून कितीतरी जास्त पटीने त्याला नरकात जाण्यास पात्र बनवता.”

16 “अहो यहूदी पुढाऱ्यांनो, परमेश्वर तुम्हाला किती कठोर शासन करणार आहे! जे आंधळे लोक इतरांचे नेतृत्व करू इच्छितात अशा लोकांसारखे तुम्ही आहात. तुम्ही म्हणता, ‘जणुकाय मंदिर एखादी व्यक्ती असल्याप्रमाणे तुम्ही एखाद्या व्यक्तीने काय करावे हे खात्री करण्यासाठी मंदिरास विनंती करतात, परंतु जर तो व्यक्ती सांगितल्याप्रमाणे करणार नाही, तर तुमच्यासाठी त्याने काहीही फरक पडत नाही. परंतु मंदिरामधील सोन्या समोर काहीतरी करण्याविषयी जर तो बोलला असेल, तर ते त्याने अवश्य केले पाहिजे.’ 17 तुम्ही मूर्ख आहात, आणि जे लोक आंधळे आहेत त्यांच्यासारखे तुम्ही आहात! मंदिरामध्ये जे सोने आहे ते तर महत्त्‍वाचे आहेच, परंतु त्याहीपेक्षा अतिशय महत्वाचे म्हणजे मंदिर आहे. कारण ते मंदिर आहे ज्यामुळे मंदिरातील सोने केवळ देवासाठी उपयोगी ठरते.

18 तुम्ही असेही म्हणतात, ‘जर एखाद्याने वेदीला तो एखादी गोष्ट करू इच्छितो ते करावे किंवा नाही अशी परवानगी जणू काही वेदीने द्यावी अशी विनंती करतो, मग वचन दिल्याप्रमाणे तो ते कार्य करत नाही, तर त्याने काही फरक पडत नाही. परंतु त्याने वेदीवर जी भेट दिली आहे त्याने काय करावे हे जर त्याने तिला विचारले, तर मग त्याने ते नक्कीच केले पाहिजे.’ 19 जे लोक आंधळे आहेत त्यांच्या सारखे तुम्ही झाला आहात. तुम्ही वेदीवर जी भेट चढवता ती महत्त्वाची आहे, परंतु तिच्याहूनही अधिक महत्त्वाची ती वेदी आहे कारण त्यामुळेच देवाच्या उपयोगासाठी ती भेट पवित्र झाली आहे.

20 म्हणून जे लोक काहीतरी करण्याची शपथ घेतात आणि मग वेदीच्या समोर ती करण्याची खात्री देतात की ते ती गोष्ट करणार आहेत, तर मग वेदीवरील सर्व गोष्टींनीही तसेच करावे अशी ते विनंती करतात. 21 होय, तसेच जे लोक एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेतात आणि त्याच्यासाठी मंदिराला साक्षीदार म्हणून ठेवतात, तर वास्तविक पाहता ती गोष्ट करण्यासाठी ते देवाला साक्षीदार म्हणून ठेवतात कारण मंदिर त्याचे आहे. 22 आणि तसेच जे लोक काहीतरी करण्याचे अभिवचन देतात आणि त्यासाठीच स्वर्गाला साक्षीदार म्हणून ठेवतात, तर ते वास्तविक पाहता सिंहासनावर बसलेल्या देवाला साक्षीदार म्हणून ठेवत आहेत, आणि ते त्याच्या सिंहासनाला ही साक्षीदार म्हणून ठेवतात.”

23 “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो आणि तुम्ही परूश्यांनो, परमेश्वर देव तुम्हांला किती कठोरपणे शासन करणार आहे! तुम्ही सर्व ढोंगी आहात, कारण तुम्ही ज्या भाज्यांचे उत्पादन करता, जसे की बडीशेप, पुदिना, आणि जिरे ह्या सर्वांचा एक दहावा हिस्सा तुम्ही देवाला देता, तरी जे देवाचे नियम त्याहूनही महत्त्वाचे आहे त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून त्यांचे पालन करत नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही इतर लोकांबरोबर न्यायाने वागत नाहीत, इतरांसोबत तुम्ही दयाळूपणे वागत नाहीत आणि तुम्ही लोकांची फसवणूक करता. तुमच्या भाजीपाल्याचा दहावा हिस्सा देवाला देणे चांगले आहे, परंतु तुम्ही त्याहूनही इतर महत्त्वाच्या नियमांचे पालन देखील केले पाहिजे. 24 इतरांना नेतृत्व देणाऱ्या आंधळ्या लोकांसारखे तुम्ही सर्व पुढारी झाला आहात. तुम्ही पाणी पिताना त्याच्यातील अगदी छोटासाही किटक तुम्ही गिळू नये म्हणून ह्याची फार काळजी घेता, परंतु तुमची कृती मात्र एखाद्या मोठ्या उंटाला गिळून टाकण्यासारखी वाईट आहे!

25 “अहो ढोंग्यांनो, तुम्ही नियमशास्त्राच्या शिक्षकांनो आणि तुम्ही परूश्यांनो, देव तुम्हाला भयंकर शासन करणार आहे! इतर लोकांच्या समोर तुम्ही चांगले आहात असे वर्तन करता. स्त्रियांनी बाहेरूनच धुतलेले कप आणि ताटासारखे तुम्ही आहात, परंतु इतरांपासून जे अन्न आणि पेय पदार्थ तुम्ही एवढे घेतले आहेत जेवढ्यांची तुम्हाला आवश्यकता नाही अशा सर्व अन्नपदार्थांनी ती ताटे आणि ते प्याले आत मधून घाणेरडे आहेत. 26 अहो आंधळ्या परूश्यांनो! सर्वप्रथम तुम्ही इतरांपासून चोरी करणे थांबवले पाहिजे. त्यानंतरच तुम्ही जे काही न्याय आणि योग्य आहे ते करण्यास सक्षम व्हाल. त्यानंतर तुम्ही अशा प्याल्यासारखे व्हाल जो बाहेरून आणि आतुनही स्वच्छ केलेला आहे.”

27 “अहो ढोंग्यांनो, तुम्ही मनुष्य जे इतरांना नियम शास्त्र शिकवता आणि तुम्ही जे परूशी आहात देव तुम्हाला भयंकर शासन देणार आहे! मेलेल्या लोकांच्या कबरांवर ज्या शुभ्र पांढर्‍या रंगाच्या कबरा बांधलेल्या आहेत त्यासारखे तुम्ही आहात, तुम्ही त्या शुभ्र पांढऱ्या रंगाने रंगवलेले आहात जेणेकरून लोकांनी त्यांना स्पर्श करू नये. त्या कबरा दिसायला तर सुंदर आहेत, परंतु आतमधून त्या मेलेल्या लोकांच्या हाडांनी आणि सडलेल्या मासांनी पूर्णपणे भरलेल्या आहेत. 28 तुम्हीही त्या कबरींसारखे आहात. जेव्हा तुमच्याकडे लोक पाहतात, तर ते तुम्हा विषयी असा विचार करतात की तुम्ही फार नीतिमान आहात, परंतु तुम्ही अंतर्यामामध्ये ढोंगी आहात, कारण तुम्ही देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करता.”

29 “यहूदी नियम शिकवणाऱ्या शिक्षकांनो आणि अहो परूश्यांनो तुम्ही ढोंगी आहात! देव तुम्हाला किती भयंकर शासन देणार आहे! फार पूर्वी ज्यांनी संदेष्ट्यांना ठार केले त्या संदेष्ट्यांच्या कबरांना तुम्ही बांधून काढता. नीतिमान मनुष्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या स्मृतींना तुम्ही सुशोभित करता. 30 तुम्ही म्हणता, “आमचे पूर्वज जिवंत होते त्या काळात जर आम्ही जगलो असतो, तर आम्ही संदेष्ट्यांना ठार करणाऱ्या लोकांना कधीच मदत केली नसती.” 31 अशाप्रकारे, तुम्ही हे स्वीकार करता की तुम्ही त्या खून करणाऱ्या लोकांचे वंशज आहात; आणि म्हणून, तुम्हीही अगदी त्यांच्या सारखेच आहात!

32 तुमच्या पूर्वजांनी ज्या सर्व पातकांना करण्याचा आरंभ केला होता, तुम्ही देखील त्या सर्व पापांना पूर्ण कराल, कारण तुम्ही त्यांचे वंशज आहात. 33 तुम्ही किती दुष्ट लोक आहात! विषारी सापांच्या सारखे तुम्ही धोकादायक आहात! देवाने तुम्हाला नरकामध्ये शासन करावे यापासून तुम्ही वाचणार आहात असा तुम्ही मूर्खतेचा विचार करता!

34 तुम्ही ह्याची नोंद घ्या ह्याच कारणामुळे मी तुम्हाकडे संदेष्टे, ज्ञानी पुरुष, आणि शिक्षक पाठवणार आहे. तुम्ही त्यांच्यापैकी काहींना वधस्तंभावर खिळून ठार करणार आहात, आणि तुम्ही त्यांच्यापैकी इतरांना इतर प्रकारे ठार करणार आहात. त्यांच्यापैकी काही लोकांना तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी चाबकांनी फटके माराल ती ठिकाणे तुमची उपासनेची ठिकाणे असतील आणि त्यांच्यापैकी काहींना तुम्ही वेगवेगळ्या शहरांमधून बाहेर हाकलून लावाल. 35 म्हणून देवाच्या दृष्टीने तुम्ही आणि तुमचे पूर्वज संपूर्ण पृथ्वीवर राहणाऱ्या नीतिमान लोकांना, ज्यामध्ये आदामाचा पुत्र हाबेल, जो एक नीतिमान पुरुष होता, बराख्याचा मुलगा जखर्‍या, ज्याला तुमच्या पूर्वजांनी मंदिर आणि वेदी ह्यांच्यातील पवित्र ठिकाणी ठार केले ह्याचा दोष देव तुम्हाला लावील. ते दोन पुरुष ज्या काळामध्ये जगले त्यामधील सर्व नीतिमान संदेष्ट्यांना तुम्हीच ठार केले आहे. 36 याविषयी विचार करा: तुम्हा लोकांनी माझ्या सेवा कार्याला आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, आणि देवच तुम्हाला त्या सर्व संदेष्ट्यांना ठार केल्याबद्दल शिक्षा देणार आहे!”
यरूशलेमेच्या भविताव्याबाबत येशूचे दुःखोद्गार

37 “अहो यरुशलेमेतील लोकांनो, देवाने ज्यांना पाठवले त्यांना धोंडमार करणाऱ्यांनो आणि फार पूर्वी संदेष्ट्यांना ठार करणाऱ्या लोकांनो. तुम्हाला सुरक्षा द्यावी म्हणून मी अनेकदा तुम्हाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे, जशी एखादी कोंबडी आपल्या लहान पिलांना आपल्या पखांखाली एकत्र करते तसेच मी अनेकदा केले आहे. परंतु मी तसे करावे अशी तुमची इच्छा नव्हती. 38 म्हणून तुम्ही आता हे ऐका: तुमचे शहर आता एक ओसाड स्थान होणार आहे. 39 तुम्ही हे आपल्या मनामध्ये लक्षपूर्वक बाळगा: मी जेव्हा पुन्हा परत येईन तेव्हाच मी तुमच्या दृष्टीस पडेन, तुम्ही त्यावेळेस माझ्याविषयी असे म्हणाल, “देवाच्या अधिकाराने येणाऱ्या ह्या मनुष्यावर देव खरोखर प्रसन्न झाला आहे.”