9
पक्षघाती मनुष्य

1 येशू व त्याचे शिष्य तारवात चढले. त्यांनी सरोवरावरून तारू हाकारले आणि कफर्णहूमास गेले, हे तेच शहर होते जेथे तो राहत होता. 2 काही लोकांनी पक्षघात झालेल्या एका मनुष्याला त्याच्याकडे आणिले, तो अंथरुणावर झोपलेला होता. पक्षघात झालेल्या मनुष्याला तो बरे करू शकतो असा त्यांचा विश्वास आहे हे जाणून येशू त्याला म्हणाला, “मुला, धीर धर! मी तुझ्या अपराधांची क्षमा करतो.

3 यहूदी नियम शास्त्र शिकवणारे काही लोक आपसात बोलू लागले, “हा मनुष्य स्वतःला देव समजतो; तो पापांची क्षमा करू शकत नाही!” 4 ते काय विचार करत आहेत हे येशूला समजले, म्हणून तो त्यांना म्हणाला, “माझ्या विषयी वाईट विचार करू नका! 5 ‘मी तुझ्या पापांची क्षमा करतो,’ असे ह्या मनुष्याला म्हणणे कोणालाही कठीन जाणार नाही, कारण हे खरंच घडते किंवा नाही हे कोणीही पाहू शकत नाही. परंतु ‘ऊठ आणि चालू लाग!’ असे कोणीही त्याला म्हणू शकत नाही, कारण तो परत चालू शकतो की नाही हे लोक सहजपणे पाहू शकतात! 6 म्हणून मी असे काही करणार आहे जेणेकरून तुम्हांला हे समजावे की देवाने मनुष्याच्या पुत्राला, पृथ्वीवर असतांना लोकांच्या अपराधांची क्षमा करण्याचा अधिकार दिलेला आहे.” मग तो त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला, “ऊठ, आपले झोपण्याचे अंथरुण उचल, आणि घरी जा!”

7 लगेचच तो मनुष्य उठला, आपले झोपण्याचे अंथरूण उचलले, आणि घरी गेला! 8 लोक समुदायाने हे पाहिले तेव्हा, ते विस्मीत झाले. देवाने मानवजातीला अशा गोष्टी करण्याचा अधिकार दिल्याबद्दल त्यांनी त्याची स्तुती केली.
मत्तयाला पाचारण

9 येशू तेथून दूर जात असता, त्याने मत्तय नावाच्या मनुष्याला पाहिले. रोमी सरकारकरीता कर गोळा करण्यासाठी तो एका टेबलाजवळ बसलेला होता. येशू त्याला म्हणाला, “माझ्या बरोबर ये आणि माझा शिष्य हो!” मग मत्तय उठला आणि त्याच्या बरोबर गेला.

10 येशू आणि त्याचे शिष्य एका घरात जेवणासाठी बसले. ते जेवण करत असता, पुष्कळ कर गोळा करणारे आणि मोशेच्या नियमशास्त्राकडे दुर्लक्ष करणारे इतर लोक आले आणि ते त्याच्या सोबत जेवू लागले. 11 परुश्यांनी हे पाहिले तेव्हा ते शिष्यांकडे गेले आणि म्हणाले, “तुमचा गुरु कर गोळा करणारे आणि इतर जे त्यांच्या सारखे आहेत त्यांचा सहभागी होतो आणि त्यांच्या सोबत जेवतो हे फार तिरस्करणीय आहे.”

12 ते काय बोलत आहेत हे येशूने ऐकले म्हणून त्याने त्यांना ही बोधकथा सांगितली: जे लोक आजारी आहेत त्यांना वैद्याची गरज आहे, जे चांगले आहेत त्यांना नाही. 13 देवाने बोललेल्या ह्या शब्दाचा अर्थ काय आहे हे तुम्ही शिकायला हवे: ‘तुम्ही केवळ यज्ञार्पणेच करू नये तर लोकांबरोबर दयेनेही वागले पाहिजे अशी माझी इच्छा आहे.’ हे लक्षात असू द्या, जे लोक स्वतःला नीतिमान समजतात त्यांनी आपल्या पापमय जिवनापासून मागे फिरावे आणि माझ्याकडे यावे म्हणून नव्हे तर, ज्या लोकांना माहित आहे की ते पापी आहेत त्यांनाच बोलावण्यासाठी मी आलो आहे.”
उपास

14 मग बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य येशूकडे येऊन त्याला विचारू लागले, “आम्ही व परूशी उपास करतो कारण देवाला संतोषवावे अशी आमची इच्छा आहे, परंतु तुमचे शिष्य तसे करत नाहीत. ते का करत नाहीत?” 15 येशूने उत्तर दिले, “जेव्हा नवरदेव विवाहाच्या वेळेस त्याच्या मित्रांबरोबर आहे, तेव्हा ते लोक उपाशी राहणार नाहीत, हो की नाही? नाही, कारण त्या घटकेस ते दुःखी नसतील. परंतु नवरदेवाला त्यांना सोडून जाण्याची वेळ येईल, तेव्हा ते अन्नापासून दूर राहतील, कारण तेव्हा ते दुःखी असतील.

16 लोक जुन्या कपड्याला पडलेले छिद्र दुरूस्त करण्यासाठी सुती कापडाचे ठिगळ त्याच्यावर लावत नाहीत. जर त्यांनी असे केले तर जेव्हा ते त्या कपड्याला धुऊन काढतील, तेव्हा ते ठिगळ आकसून जाईल आणि कपड्याला फाडून टाकील, आणि छिद्र अजून मोठे होईल.

17 ताजा द्राक्षाचा रस कोणीही जुन्या कातडी पिशव्यांमध्ये ओतून साठवत नाहीत. जर कोणी तसे केले तर, द्राक्षाचा रस जेव्हा मद्यामध्ये परिवर्तीत होईल तेव्हा त्या कातडी पिशव्या फाटून जातील. त्या पिशव्या नष्ट होतील, आणि तो द्राक्षारस जमिनीवर सांडून जाईल. त्या ऐवजी, लोक नविन द्राक्षाचा रस नविन कातडी पिशव्यांमध्ये ठेवतात, आणि जेव्हा तो द्राक्षाचा रस आंबून जातो तेव्हा त्या पिशव्या फुगतात. ह्याच प्रकारे, पिशवी आणि द्राक्षारस दोन्हीपण सुरक्षीत राहतात.”
याइराची कन्या व रक्तस्त्रावी स्त्री

18 येशू हे बोलत असता, शहरातील एक पुढारी त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे लवून नमन केले. मग तो म्हणाला, “माझी मुलगी आताच मरण पावली आहे! परंतु जर तुम्ही येऊन तिच्यावर आपले हात ठेवले, तर ती पुन्हा बरी होईल!” 19 म्हणून येशू उठला, आणि तो व त्याचे शिष्य त्या मनुष्यासोबत गेले. 20-21 मग बारा वर्षांपासून रक्तस्त्रावाने पिडीत असलेली एक स्त्री येशूच्या जवळ आली. ती स्वतःशीच म्हणत होती, “मला रक्तस्त्रावाचा त्रास आहे हे कोणालाही न समजता येशूने मला बरे करावे. म्हणून जर मी त्याला स्पर्श केला किंवा मी केवळ त्याच्या वस्त्राला जरी स्पर्श केला, तर या विषयी कोणालाही न कळता मी बरी होईन.” म्हणून ती त्याच्या मागून आली आणि त्याच्या वस्त्राच्या कोपऱ्याला शिवले. 22 मग येशूने मागे वळून पाहिले की त्याला कोणी स्पर्श केला. आणि जेव्हा त्याने त्या स्त्रिला पाहिले, तो तिला म्हणाला, “बाई, धीर धर. मी तुला बरे करू शकतो असा तू विश्वास ठेवलास म्हणून, मी तुला बरे केले आहे.” अगदी त्याच क्षणी ती स्त्री बरी झाली.

23 येशू त्या मनुष्याच्या घरी आल्यावर बासरी वाजवणाऱ्यांना अंत्यसंस्काराचे संगीत वाजवतांना पाहिले; आणखी तेथे पुष्कळ विलाप करणारे आणि शोक करणाऱ्यांना त्याने पाहिले कारण ती मुलगी मरण पावली होती. 24 तो त्यांना म्हणाला, “अंत्यसंस्काराचे संगीत वाजवणे आणि विलाप करणे थांबवा आणि येथून दूर व्हा, कारण मुलगी मेलेली नाही! ती केवळ झोपलेली आहे!” लोकांना हे माहित होते की ती मेलेली आहे, म्हणून ते त्याच्यावर हसू लागले.

25 परंतु येशूने त्यांना घरा बाहेर जाण्यास सांगितले. मग मुलगी झोपली होती त्या खोलीत त्याने प्रवेश केला, त्याने तिचा हात धरून ठेवला व ती पुन्हा जिवंत झाली. 26 आणि हे सर्व त्या प्रांतातील लोकांनी ऐकले.
दोन आंधळे

27 येशू तेथून जात असता, दोन आंधळे मनुष्य त्याच्या मागे येऊन ओरडू लागले, “दावीद राजाच्या पुत्रा, आमच्यावर दया करून आम्हांला बरे कर!” 28 येशू त्याच्या स्वतःच्या घरात गेला, आणि ते दोन आंधळे मनुष्य त्याच्या मागे त्या घरात गेले. येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला बरे करण्यास सक्षम आहे असा तुम्ही विश्वास ठेवता काय?” ते त्याला म्हणाले, “होय, प्रभू!”

29 मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला दृष्टी देण्यास सक्षम आहे असा तुम्ही विश्वास धरला, म्हणून मी आताच तुम्हांला दृष्टी देतो!” 30 आणि त्यांना पाहता येऊ लागले! मग येशूने त्यांना बजावून सांगितले, “मी तुमच्यासाठी जे काही केले ते कोणालाही सांगणार नाही ह्याची खात्री करा. 31 परंतु त्यांनी बाहेर जाऊन त्या संपूर्ण प्रदेशात ही वार्ता पसरवली.
मुका भूतग्रस्त

32 मग ते दोन पुरूष तेथून गेले तेव्हा, दुष्ट आत्म्याने वश केल्या मुळे जो बोलू शकत नव्हता अशा एका मनुष्याला काही लोकांनी येशूकडे आणिले. 33 येशूने त्या दुष्ट आत्म्याला बाहेर काढल्या नंतर तो मनुष्य बोलू लागला! लोकसमुदायाने हे पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “अशा प्रकारच्या अद्भुत गोष्टी या पूर्वी इस्राएलामध्ये घडतांना आम्ही कधीच पाहील्या नव्हत्या!” 34 परंतु परूशी म्हणाले, “तो सैतानच आहे, जो दुष्टआत्म्याने राज्य करतो, त्याच्याद्वारेच ह्या मनुष्यामधून भूतांना बाहेर काढले आहे.”

35 मग येशू आणि त्याचे शिष्य गालील जिल्ह्यातील पुष्कळ गावामधून आणि नगरांमधून फिरले. लवकरच देव स्वतःला एक राजा म्हणून प्रकट करणार आहे असे तो सभास्थानात शिकवत होता आणि ह्या विषयीची शुभवार्ता लोकांना सांगत होता. आणखी त्याने लोकांना त्यांच्या निरनिराळ्या आजारातून आणि रोगातून बरे केले. 36 त्याने लोकांच्या गर्दीला पाहिले तेव्हा त्यांच्या विषयी त्याला फार दुःख वाटले, कारण ते निराशेत आणि काळजीमध्ये होते. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे ते होते.

37 मग तो त्याच्या शिष्यांना म्हणाला: “माझ्या संदेशाचा स्वीकार करण्यासाठी तयार असलेले लोक जणू काय कापणीसाठी तयार झालेल्या पिकाप्रमाणे आहेत, परंतु पिक गोळा करण्यास जाण्यासाठी फार थोडके लोक आहेत. 38 म्हणून पिक गोळा करण्यासाठी अधिक जास्त लोक पाठवावे म्हणून प्रभू देवा कडे प्रार्थना करा.”