7
इतरांचे दोष काढण्याबाबत.
1
इतरांनी किती पापमय कृत्ये केली आहेत याविषयी बोलू नका, जेणेकरून तुम्ही किती पापमय कृत्ये केली आहेत असे देवाने तुमच्या विषयी म्हणू नये.
2
तुम्ही इतर लोकांचे दोष काढले तर, देव तुम्हांला दोषी ठरवील. ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढले तसे, तुमचेही दोष काढण्यात येतील.
3
तुमच्या पैकी कोणीही इतर कोणाच्याही छोट्याशा चूकीबद्दल चिंताकुल होऊ नये! हे त्या व्यक्तीच्या डोळ्यात गेलेल्या कचऱ्याचा कण पाहण्यासारखे आहे. परंतु तुम्ही तर आपल्या स्वतःच्या मोठ्या अपराधाबद्दल चिंताकुल व्हावे. हे जणू काय एखाद्या लाकडाचा ओंडका तुझ्या डोळ्यात असल्या प्रमाणे आहे हे तुझ्या लक्षात येत नाही.
4
इतर लोकांच्या किरकोळ चूकांबद्दल तुम्ही असे बोलू नये, ‘मला तुझ्या डोळ्यातील कचऱ्याचा कण बाहेर काढू दे!’ तुझ्या स्वतःच्या डोळ्यात लाकडाचा ओंडका असून सुद्धा, तू असे बोलू शकत नाही!’
5
अहो ढोंग्यानो, सर्व प्रकारे मोठी पापे करणे थांबवा. मगच तुम्ही इतरांना त्यांची लहान पापे करणे थांबवण्यास सक्षम व्हाल.”
6
ज्या गोष्टी देवाच्या आहेत त्या तुम्ही अशा कुत्र्यांना देता जे नंतर तुम्हावरच हल्ला करतील. आणि तुम्ही मौल्यवान मोती डुकरांपुढे फेकू नये, कारण ते त्याच्या वरून चालतील. ह्याच प्रकारे जर तुला हे माहीत आहे की, देवाविषयीच्या अद्भुत गोष्टी सांगितल्यावर देखील ते तुझ्याशी वाईट वागतील अशा लोकांना त्या तू सांगू नये.
प्रार्थना करण्यास प्रोत्साहन
7
“ज्याची तुम्हांला गरज आहे ते देवाकडे मागत राहा, आणि त्याने ते तुम्हांला द्यावे ह्याची अपेक्षा करतच राहा.
8
प्रत्येकजण जो देवाकडे काहीतरी मागतो, आणि जो त्याने त्याला द्यावे अशी अपेक्षा करतो, तो प्राप्त करील.
9
तुमच्या मुलाने जर तुम्हांला भाकर मागीतली, तुमच्या पैकी कोणीही त्याला धोंडा देणार नाही, हो की नाही?
10
तुमच्या मुलाने जर तुम्हांला मासा मागीतला, तर तुमच्या पैकी कोणीही त्याला साप देणार नाही, हो की नाही?
11
तुम्ही जरी वाईट आहात तरी, आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी कशा द्याव्या हे तुम्हांला समजते. मग देव, तुमचा पिता जो स्वर्गात आहे, जे त्याला मागतात त्यांना कितीतरी चांगल्या गोष्टी निश्चितच देईल.
सुवर्णनियम
12
तर इतरांनी तुमच्याशी कशा प्रकारे वर्तन करावे असे तुम्हांला वाटते, तशाच प्रकारे तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करावे, कारण देवाच्या नियमांचे आणि फार काळापूर्वी संदेष्ट्यांनी लिहिले त्या सर्वांचे सार हेच आहे.
दोन रस्ते
13-14
देवा सोबत सर्वकाळामध्ये राहण्यास स्वर्गात जाणे हे फार कठीन आहे; हा तोच कठीन मार्ग आहे जो तुम्ही निवडला पाहिजे. तेथे अजून एक मार्ग आहे, ज्याने पुष्कळ लोक जातात, व तो मार्ग रुंद आहे; ते रुंद फाटक येईपर्यंत चालतील, परंतु ते जेव्हा त्यामधून प्रवेश करतील, तेव्हा ते मरण पावतील. म्हणून मी तुम्हांला सांगतो की तुम्ही कठीन मार्ग निवडावा आणि स्वर्गात देवासोबत सर्वकाळ जगण्यासाठी अरुंद फाटकाने आत प्रवेश करावा.”
खरे व खोटे शिक्षक
15
तुमच्याकडे येऊन देव काय म्हणाला हे तुमच्याशी खोटेपणाने बोलणाऱ्या लोकांविषयी सावध असा. ते काही उपद्रव करणार नाहीत असे वाटतात, परंतु ते सत्य नाही. स्वतःला मेंढरांच्या वेशात लपवलेल्या लांडग्यांप्रमाणे ते आहेत. ते निरुपद्रवी मेंढरे आहेत असा लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा असे त्यांना वाटते, परंतु खरोखर एखाद्या लांडग्यांप्रमाणे ते तुमच्यावर हल्ला करतात.
16
मग तुम्ही कसे ओळखाल की ते खोटे आहे? तर मग, झाडाने दिलेल्या फळाला पाहून, तुम्हांला समजेल की ते झाड कोणते आहे. उदाहरणार्थ, काटेरी झुडूप द्राक्षे देत नाही, म्हणून कोणीही काटेरी झुडूपावरून द्राक्षे तोडण्याचा विचार देखील करणार नाही. आणि रिंगणीचे झाड अंजीराचे फळ देत नाही, म्हणून कोणीही रिंगणीच्या झाडावरून अंजीर तोडण्याचा विचार देखील करणार नाही.
17
येथे आणखी एक उदाहरण आहे: सर्व चांगली फळे देणारी झाडे चांगलीच फळे देतात, परंतु सर्व निरुपयोगी झाडे अयोग्य फळ देतात.
18
कोणतेही चांगले झाड निरुपयोगी फळ देत नाही, आणि कोणतेही वाईट झाड चांगले फळ देत नाही.
19
जे झाड चांगले फळ देत नाही अशा प्रत्येक झाडाचे कामकरी तुकडे करतील आणि त्या सर्वांना जाळून टाकतील.
20
झाडे कोणती फळे देतात हे पाहून, तुम्हांला समजते की ती झाडे कोणती आहेत. त्याच प्रकारे, तुमच्याकडे येणारे लोक काय करतात हे तुम्ही पाहाल तेव्हा, ते खरोखर देवासाठीच बोलतात किंवा नाही हे तुम्हांला समजेल.
उक्ती आणि कृती
21
पुष्कळ लोक मला वारंवार प्रभू म्हणून हाका मारत असले तरी सुद्धा, जणू काय त्यांना मीच अधिकार दिला आहे असे ते दाखवतात, त्यांच्यापैकी काही लोकांवर देव राज्य करण्यास मान्य होणार नाही, कारण त्याची जशी इच्छा आहे त्या प्रमाणे ते करीत नाहीत. माझा पिता केवळ त्यांच्यावर राज्य करण्यास मान्य होईल जे त्याच्या इच्छेप्रमाणे करतात.
22
ज्या दिवशी देव प्रत्येकाचा न्याय करील, तेव्हा पुष्कळ लोक मला म्हणतील, ‘प्रभू, आम्ही तुझे प्रतिनिधी म्हणून देवाचा संदेश सांगितला! तुझे प्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांमधून भूते बाहेर काढली! आणि तुझे प्रतिनिधी म्हणून, आम्ही पुष्कळ वेळा अद्भुत कामे केली!’
23
मग मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, ‘तुम्ही माझे आहात हे मी कधीच स्वीकार केले नव्हते. अहो वाईट करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा!’”
दोन पाये
24
तर मग, मी जे काही सांगतो ते जो कोणी ऐकतो आणि मी आज्ञापिल्याप्रमाणे करतो, तो ज्याने आपले घर खडकावर बांधले अशा एका हुशार मनुष्यासारखा आहे.
25
मग पाऊस जरी आला आणि नदीला पूर आला, आणि वाराही सुटला व त्या घरावर आदळला, तरी ते खाली पडणार नाही कारण ते एका मजबूत खडकावर बनवलेले आहे.
26
दुसरीकडे, जो कोणी मी सांगतो ते ऐकतो आणि त्या प्रमाणे आज्ञापालन करत नाही तो, ज्याने आपले घर वाळूवर बांधले अशा एका मूर्ख मनुष्यासारखा आहे.
27
मग पाऊस पडला आणि नदीला पूरही आला, आणि वारा सुटला व त्या घरावर आदळला, तेव्हा ते घर पूर्णपणे कोलमडून पडले व नष्ट झाले, कारण ते वाळूवर बांधलेले होते. म्हणून मी तुम्हांला जे काही सांगितले त्याचे तुम्ही आज्ञापालन करायलाच हवे.
28
येशूने ह्या सर्व गोष्टी शिकवण्याचे संपविल्यावर, ज्या लोकसमुदायाने त्याचे ऐकले त्यांना त्याच्या शिकवणीचे खुप आश्चर्य वाटले.
29
जो स्वतःला माहित असलेल्या गोष्टींवर अवलंबून असतो अशा एका शिक्षकाप्रमाणे त्याने शिकवले. यहूदी नियमशास्त्र शिकवणारे जसे इतरांनी शिकवलेल्या गोष्टीच पुन्हा-पुन्हा शिकवतात, तसे त्याने शिकवले नाही.