5
डोंगरावरील प्रवचन

1 येशूने मोठ्या जमावाला पाहिले तेव्हा, तो एका डोंगर माथ्यावर गेला. त्याच्या अनुयायांना शिकवता यावे म्हणून तेथे तो खाली बसला. ते त्याचे ऐकण्यासाठी त्याच्या अधिक जवळ आले. 2 मग त्याने असे बोलून त्यांना शिकवण्यास आरंभ केला:

धन्यवाद
3 “देव त्या लोकांबरोबर संतुष्ट आहे जे मान्य करतात की त्यांना देवाची गरज आहे;
तो स्वर्गातून त्यांच्यावर राज्य करण्यासाठी मान्य होईल.
4 या पापी जगामुळे जे शोक करतात अशा लोकांबरोबर देव संतुष्ट आहे;
तो त्यांना प्रोत्साहन देईल.

5 जे नम्र आहेत अशा लोकांबरोबर देव संतुष्ट आहे;
त्यांना देवाने नवीन केलेल्या पृथ्वीचे वतन मिळेल.
6 जसे एखाद्या व्यक्तीला खाण्या-पिण्याची इच्छा असते त्याच प्रमाणे जे लोक नीतिमत्तेत जगण्याची इच्छा धरतात त्यांच्या बद्दल देव संतुष्ट आहे;
तो त्यांना नीतिमत्तेने जगण्यास पात्र करील.
7 इतरांसोबत दयेने वागणाऱ्या लोकांबरोबर; देव संतुष्ट आहे.
त्यांच्याशी तो दयाळूपणे वागेल.
8 देव त्याच लोकांबरोबर संतुष्ट आहे; जे केवळ त्यालाच संतोष मिळेल असे करण्याचा प्रयत्न करतात.
जेथे देव आहे तेथे एके दिवशी ते देखील राहतील आणि त्याला पाहतील.

9 इतरांना शांतीने राहण्यास मदत करणाऱ्या लोकांबरोबर देव संतुष्ट आहे;
तो त्यांना त्याची स्वतःची मुले लेखील.
10 प्रामाणिकपणे जगल्यामुळे ज्यांच्या सोबत वाईट घडले त्यांच्या बरोबर देव संतुष्ट आहे;
तो त्यांच्यावर राज्य करण्यास मान्य असेल.

11 माझ्या नावावर विश्वास ठेवला म्हणून लोक तुमचा अपमान करतील, ते तुमच्याशी वाईट वर्तन करतील आणि जेव्हा इतर लोक तुम्हांला वाईट म्हणतील तेव्हा देव तुमच्याबरोबर संतुष्ट आहे. 12 हे घडेल तेव्हा, आनंदित व्हा आणि उल्हास करा, कारण देव तुम्हांला स्वर्गात मोठे प्रतिफळ देईल. देव तुमच्या विषयी चांगले विचार करील. देवाच्या दृष्टीने जे प्रतिष्ठीत आणि चांगले अशा संदेष्ट्यांचा तुमच्या पूर्वजांनी छळ केला हे अगदी तसेच आहे.
मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले धडे

13 जसे मीठ अन्नामध्ये बदल घडवते, तसेच तुम्हांला या जगासाठी करायचे आहे. परंतु जर मिठाची शक्ती गेली तर, त्याला कोणाच्यानेही परत आणता येणार नाही. त्याला बाहेर फेकून दिले जाऊन लोक त्याच्यावरून चालतील. 14 अंधारात असलेल्या लोकांसाठी दिवा प्रकाश देतो, तेच तुम्हांला या जगासाठी करायचे आहे. जसे डोंगरावर वसलेल्या शहराला पाहावे, तसे लोक तुम्हांला पाहतील.

15 दिवा लावल्यानंतर, ते त्याला टोपली खाली ठेवत नाहीत. तर, त्याला दिवा ठेवण्याच्या जागेवरच ठेवतात, जेथून त्यांच्या घरात असणाऱ्या सर्व लोकांवर त्याचा प्रकाश पडावा. 16 अगदी तसेच, जे काही योग्य आहे ते तुम्ही अशाप्रकारे करावे की तुम्ही काय करता हे लोक पाहू शकतील. तुम्हाला असे करतांना ते पाहतील, तेव्हा ते तुमच्या स्वर्गातील पित्याची स्तुती करतील.”
जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण

17 “देवाने मोशेला दिलेले नियम किंवा जे काही संदेष्ट्यांनी लिहिले आहे, त्यापासून वेगळे करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे असे समजू नका. त्या ऐवजी, ज्या गोष्टी घडायलाच पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे त्या पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे. 18 हे लक्षात असू द्या: ह्या नियमांमधील सर्व काही, ज्या गोष्टी कमी महत्त्वाच्या वाटतात त्यासुद्धा, आणि त्यातील लहानातील लहान गोष्टींचे स्पष्टीकरण—आकाश आणि पृथ्वी दृष्टीआड होईपर्यंत आणि देवाने जे घडणार आहे त्या विषयी त्याच्या लेखकांना लिहिण्यास सांगितले ते पूर्ण होईल तोपर्यंत सर्वकाही नक्कीच खरे ठरेल. 19 कारण ते सत्य आहे, त्या आज्ञांपैकी छोटीशी आज्ञा जरी तुम्ही मोडली, आणि लोकांना ती मोडण्यासाठी जर तुम्ही शिकवता, तर जेव्हा देव स्वतःला राजा म्हणून प्रकट करेल तेव्हा तुम्ही कमी महत्त्वाचे असाल. तथापि, जर या सर्व आज्ञा तुम्ही पाळता आणि तशाच गोष्टी इतरांना पाळण्यास शिकवता, त्या वेळेस तुम्ही फार मानास्पद असे व्हाल. 20 ह्याच कारणामुळे, मी तुम्हास सांगतो की परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांपेक्षा तुम्ही ह्या नियमांचे पालन करायलाच हवे. जर तुम्ही असे केले नाही, तर देव तुमच्यावर राज्य करण्यास मान्य होणार नाही.
राग व खून

21 “देव आमच्या पूर्वजांशी जे काही बोलला हे तुम्ही इतरांकडून ऐकले आहे, ‘तुम्ही कोणालाही ठार मारू नये,’ आणि, ‘जर तुम्ही कोणाला ठार मारले तर शासकीय समितीचे सभासद तुम्हांला मरण दंडाची शिक्षा देतील.’ 22 परंतु मी तुम्हांला सांगतो, जर तुम्ही कोणा सोबतही रागावलात, तर देव स्वतः तुमचा न्याय करील,’ जर तुम्ही एखाद्याला असे म्हणाल, ‘तू निरूपयोगी आहेस,’ तर प्रशासन करणारी समिती तुझा न्याय करील. जर तुम्ही एखाद्याला म्हणाल, ‘तू मूर्ख आहेस,’तर देव तुम्हांला नरकाच्या अग्नीमध्ये फेकून देईल.

23 म्हणून जेव्हा तू आपली भेट देवासाठी वेदीकडे घेऊन जात असता, जर तुला तेथे आठवले की तू आपल्या भावाला अपमानीत केले आहे, 24 तर वेदीजवळच आपली भेट तशीच ठेव, आणि प्रथम त्या भावाकडे जा ज्याला तू अपमानीत केले आहे. आणि जे काही तू केलेस त्या कृत्यांबद्दल मी खिन्न आहे, आणि त्या बद्दल तू मला क्षमा करावी असे त्याला सांग. नंतर जाऊन आपली भेट देवाला अर्पण कर.

25 जर तुझ्या सोबतीचा नागरिक तू काहीतरी चूकीचे केल्याबद्दल तुझ्यावर दोषारोप ठेवण्यासाठी तुला न्यायालयात घेऊन जात आहे, त्या नागरीकासोबत न्यायालयात जात आहे तोच, तू लवकरात लवकर त्याच्या सोबत समेट कर. वेळ आहे तोच असे कर जेणेकरून तो तुला न्यायकरण्यासाठी घेऊन जाणार नाही, कारण न्यायाधिशाला जर तुझ्यामध्ये दोष आढळला तर तो तुला तुरूंग रक्षकाकडे देईल, आणि तुरूंग रक्षक तुला तुरूंगात टाकेल. 26 हे लक्षात असू दे: जर तू तुरूंगात गेलास, तर तू कधीच बाहेर येऊ शकणार नाही कारण न्यायधिशाने तुला दिलेल्या शिक्षेची तू भरपाई करू शकत नाही. म्हणून आपल्या बंधूबरोबर शांतीने राहता येईल हे लक्षात ठेवा.”
अशुद्धता

27 “देव आमच्या पूर्वजांशी बोललेला तुम्ही ऐकले आहे, ‘विवाहबाह्य संबंध ठेवू नका.’ 28 परंतु मी तुम्हांला हे सांगतो: जर एखादा पुरूष एखाद्या स्त्रीकडे शारिरीक संबंध ठेवण्याच्या इच्छेने पाहतो तर, त्याच्या विषयी देव असे समजतो की त्याने अगोदरच आपल्या मनात तिच्या सोबत विवाहबाह्य संबंध ठेवला आहे.

29 एखाद्या ठराविक गोष्टीकडे पाहिल्याने जर तुमच्या कडून पाप करण्याची इच्छा होत असेल, तर त्याच्याकडे पाहणे थांबवा. पाप करणे टाळण्यासाठी जर तुझे दोन्ही डोळे जर तुला नष्ट करावे लागले तरी तू तसे कर. तू पाहात असून देवाने तुझ्या देहाला नरकात फेकून द्यावे ह्यापेक्षा तू आंधळा असावे आणि पाप करणे थांबवावे हे तुझ्यासाठी बरे होईल. 30 आणि जर तू आपल्या हातांपैकी एका हाताने पाप करण्याची तुला इच्छा होत असेल, तर तसे करणे थांबव. जर तू आपला हात कापून फेकून देणे, हे तुला पाप करणे टाळण्यासाठी जर सक्षम करत असेल तर तू तसेच करावे. आंधळे असावे आणि पाप करणे थांबवावे, देवाने तुला दोन्ही हात असता नरकात फेकून द्यावे यापेक्षा हे बरे आहे.”

31 “देवाने शास्त्रभागामध्ये म्हटले आहे, ‘जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो, त्याने ते एखाद्या दस्तऐवजावर लिहून द्यावे की तो तिला घटस्फोट देत आहे.’ 32 परंतु आता मी तुम्हास जे काही सांगतो ते ऐका: एखादा मनुष्य त्याच्या पत्नीला फक्त व्यभिचार केल्याच्या कारणावरूनच घटस्फोट देतो. तसेच जर एखादा मनुष्य त्याच्या पत्नीला दुसऱ्या कोणत्याही कारणावरून घटस्फोट देतो व ती स्त्री कोणत्याही पुरूषासोबत विवाह करते तर ती व्यभिचार करते. आणि जो पुरूष तिच्याशी विवाह करतो तो देखील तिच्या सोबत व्यभिचार करतो.”
शपथा व खरेपणा

33 “देव आमच्या पूर्वजांशी बोलला हे देखील तुम्ही तुमच्या धार्मिक शिक्षकांकडून ऐकले आहे, ‘तुम्ही देवाचे नाव घेऊन जे काही करण्याचे ठरवले आहे ते करण्याची खात्री करा!’ 34 परंतु आता मी काय म्हणतो ते ऐका: काहीही करण्यासाठी शपथ वाहू नका आणि तुमच्यापैकी कोणीतरी मोठा असेल त्याला साक्षीदार होण्यास शपथ घेऊ नका. उदाहरणार्थ, तुम्ही काही करणार आहात त्यासाठी शपथ वाहू नका आणि स्वर्गातून कोणीतरी साक्षीदार व्हावे म्हणून शपथ घेऊ नका, कारण स्वर्ग ते स्थान आहे जेथे देव त्याच्या सिंहासनावर एक राजा म्हणून बसलेला आहे. 35 आणि पृथ्वी आहे तोपर्यंत तुम्ही नक्कीच काहीतरी कराल अशी शपथ वाहू नका; कारण पृथ्वी ते स्थान आहे ज्याला देवाने आपले पाय ठेवण्याचे आसन केले आहे. आणखी, यरुशलेमेची शपथ वाहून नक्कीच काहीतरी कराल अशी शपथ वाहू नका, कारण यरुशलेम हे शहर खासकरून देवाचे आहे.

36 आणखी, तू एखादी गोष्ट करणार आहेस अशी शपथ वाहू नको आणि तू जर ती गोष्ट केली नाहीस तर त्यांनी तुझा शिरच्छेद करावा असे बोलू नको. तुमच्या डोक्यावरील केसांपैकी एकाचा देखील रंग बदलण्यास तुम्ही समर्थ नाही. 37 एखादी गोष्ट करण्याविषयी जर तुम्ही बोलत असाल, तर केवळ एवढेच म्हणा ‘होय, मी ते करणार,’ किंवा ‘नाही, मी ते करणार नाही.’ याहून अधिक जास्त जर तुम्ही काही बोललात, तर ते सैतानापासून आहे, त्या दुष्टानेच, तुम्हाला याप्रकारे जास्त बोलण्यास सुचवले आहे.”
सूड

38 “देव आमच्या पूर्वजांशी बोलला हे तुम्ही ऐकले आहे, ‘जर कोणी एकाने तुमच्या एका डोळ्याला काही इजा करतो, तर त्यांनी त्या व्यक्तीच्या डोळ्यांना इजा करावी. आणि जर कोणीएक तुमच्या एखाद्या दाताला इजा करतो, तर त्यांनी त्या व्यक्तीच्या दाताला इजा करायलाच हवी.’ 39 परंतु आता मी काय म्हणतो ते ऐका: तुम्हांला इजा पोहचवणाऱ्या व्यक्तीचा बदला घेण्यापासून दूर राहा, अगदी त्याला थांबवण्याचा प्रयत्नही करू नका. या उलट, जर कोणी तुमच्या एका गालावर मारून तुमचा अपमान करतो, तेव्हा तुमचा दुसरा गाल त्या व्यक्तीकडे करा जेणेकरून त्याने त्यावर देखील मारावे.

40 तुझा अंगरखा घेण्यासाठी जर कोणी न्यायालयात तुझ्यावर फिर्याद करू इच्छित असेल तर, त्या व्यक्तीला तुझे दोन्ही अंगरखे आणि तुझे वस्त्र देखील घेऊ दे, जे तुझ्यासाठी अतिशय मोलाचे आहे. 41 जर एखादा रोमी शिपाई तुला त्याच्या सोबत त्याचे शस्त्र घेऊन एक किलोमीटर जाण्यासाठी सक्ती करत असेल, तर तू ते त्याच्या सोबत दोन किलोमीटरपर्यंत घेऊन जावे. 42 आणखी, जर कोणी तुझ्याकडे एखादी गोष्ट मागतो, तर त्याला ती गोष्ट दे. कोणी तुझ्याकडे काही उसने मागतो, तर पुढे होऊन त्याला उसने दे.
प्रेम व सर्वांगपूर्ण शील

43 “देव आमच्या पूर्वजांशी बोललेला तुम्ही ऐकले आहे, ‘इस्राएलामधील तुमच्या सहकारी बंधुवर प्रीती करावी आणि परराष्ट्रीयांचा द्वेष करावा, कारण ते तुझे शत्रू आहेत.’ 44 परंतु आता मी काय म्हणतो ते ऐका: तुमच्या मित्रांवर तुम्ही प्रीती करता तशीच प्रीती तुमच्या शत्रूंवर करा, आणि ज्यांनी तुम्हांला त्रास दिला त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 45 तुमचा पिता जो स्वर्गात आहे, तो जसा करतो तसेच तुम्ही करा. तो सर्वांशी दयेने वागतो. उदाहरणार्थ, सुर्याने चांगल्या लोकांवर आणि वाईट लोकांवर देखील सारखाच प्रकाश टाकावा असे तो करतो, आणि जे त्याचे नियम पाळतात अशांसाठी आणि जे पाळत नाहीत अशा दोघांसाठी सुद्धा तो पाऊस पाठवतो.

46 केवळ तुमच्यावर प्रीती करणाऱ्या लोकांवरच जर तुम्ही प्रीती करता, तर ह्या सर्वांसाठी देवाने तुम्हांला प्रतिफळ द्यावे अशी अपेक्षा करू नका! अगदी जे लोक अतिशय भयंकर गोष्टी करतात, जसे की जकातदार, जे त्यांच्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच प्रीती करतात. त्यांच्यापेक्षा चांगली कृती तुम्ही करायलाच पाहिजे! 47 होय, जे तुमचे मित्र आहेत केवळ त्यांनाच जर तुम्ही सलाम करता आणि देवाने त्यांना आशिर्वादीत करावे अशी विनंती करता, तेव्हा तुम्ही इतर लोकांपेक्षा काही एक चांगले करत नाही. अगदी परराष्ट्रीय, जे देवाचे नियम पाळत नाहीत, ते सुद्धा अशाच गोष्टी करतात! 48 म्हणून तुमचा देव पिता जो स्वर्गात आहे त्याच्या सोबत तुम्ही पूर्णपणे विश्वासू असणे आवश्यक आहे, जसा तो पूर्णपणे तुमच्या सोबत विश्वासू आहे.”