21
यरुशलेमेत येशूचा प्रवेश

1-2 येशू व त्याचे शिष्य यरुशलेमजवळ आले असता, ते जैतूनाच्या डोंगराजवळच्या बेथफगे या गावी आले. नंतर येशू त्याच्या दोन शिष्यांना म्हणाला, “तुम्ही समोरच्या गावात जा. तुम्ही त्यात प्रवेश कराल तेव्हा लागलीच, एक गाढवी व तिच्याबरोबर एक शिंगरु बांधलेले असे तुम्हांला आढळेल. त्यांना सोडा आणि त्यांना माझ्याकडे येथे घेऊन या. 3 तुमच्या असे करण्याबद्दल जर कोणीही तुम्हांला काही विचारले, तर त्याला सांगा की, ‘प्रभूला यांची गरज आहे.’ त्यानंतर तो त्यांना लगेच घेऊन जाण्याची परवानगी तुम्हांला देईल.”

4-5 हे सर्व घडले, तेव्हा एका संदेष्ट्यांच्या द्वारे जे लिहले होते ते पूर्ण झाले. त्या संदेष्ट्याने लिहिले होते, “यरुशलेमेत राहणाऱ्या लोकांना सांगा, ‘पाहा! तुझा राजा तुझ्याकडे येत आहे! तो नम्रपणे येईल. तो नम्र आहे हे दाखवेन, कारण तो गाढवीच्या पिल्लावर म्हणजेच एका शिंगरावर बसून येत आहे.

6 मग ते दोन शिष्य गेले आणि येशूच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी केले. 7 त्यांनी त्या गाढवीला आणि तिच्या शिंगराला येशूकडे आणिले. त्याला बसण्यासाठी काहीतरी बनवावे म्हणून त्यांनी त्यावर आपली अंगावरील कपडे घातले. मग येशूने त्याच्यावर ताबा मिळवला आणि त्यावर बसला. 8 तेव्हा एका मोठ्या लोकसमुदायाने आपले काही बाहेरील कपडे काढून रस्त्यावर पसरले, आणि इतर लोकांनी खुजूरीच्या झाडाच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या. येशूचा सन्मान करण्याकरता ह्या गोष्टी त्यांनी केल्या.

9 लोकसमुदायातील काही त्याच्या पुढे चालत होते आणि काही त्याच्या मागे चालत होते आणि मोठ्याने ते असा जयघोष करू लागले, “दावीद राजाचा पुत्र, ख्रिस्ताची स्तुती करा!” “देवाचा प्रतिनिधी आणि देवाच्या अधिकाराने म्हणून जो येतो आहे त्याला प्रभू देव आशिर्वाद देवो.” “जो स्वर्गात परम उंच आहे, त्या देवाला स्तुती असो!” 10 येशूने यरुशलेमेमध्ये प्रवेश केला, तेव्हा शहरातील सर्व लोक फार उत्सुक झाले आणि म्हणू लागले, “या माणसाचा आदर ते अशाप्रकारे का करत आहेत?” 11 जो जमाव आधीपासून त्याच्यामागे आला होता त्यांनी उत्तर दिले, “हा गालीलातील नासरेथातून आलेला, येशू संदेष्टा आहे!”
परमेश्वराच्या भवनाचे शुद्धीकरण

12 मग येशूने मंदिराच्या अंगणात प्रवेश केला आणि तेथे जे खरेदी व विक्री करत होते त्या सर्वांना बाहेर घालवून दिले. मंदिराचा पैशांचा कर भरण्यासाठी रोमन नाण्यांना अदलाबदल करून देणाऱ्यांच्या मेजांनाही त्याने उलथून टाकिले आणि यज्ञाकरता कबूतरे विकणाऱ्यांच्या आसनालाही त्याने उलथून टाकले. 13 तेव्हा तो त्यांना म्हणाला, एका संदेष्टयाने शास्त्रलेखात लिहिले की देव म्हणतो, “जेथे लोक त्या ठिकाणी माझी प्रार्थना करतील असे माझे घर मला हवे आहे, पंरतु तुम्ही लोकांनी त्याला लुटारू जमवणाऱ्यांचे ठिकाण बनवले आहे!’”

14 त्यानंतर, अनेक आंधळे लोक आणि पांगळे लोक मंदिरात येशूकडे आले जेणेकरून त्यांना त्याने बरे करावे, आणि त्याने तसे केले.

15 यहूदी मुख्य याजक आणि यहूदी नियमांना लोकांना शिकवणारे पुरुष यांनी येशूला अद्भुत कृत्ये करतांना पाहिले. मंदिरात लहान मुलांनाही “दावीद राजाचा पुत्र, ख्रिस्ताची आम्ही स्तुती करतो” अशी घोषणा देतांना त्यांनी पाहिले, तेव्हा ते फार क्रोधीत झाले कारण येशू हाच ख्रिस्त आहे असा विश्वास ते धरत नव्हते. 16 येशूने त्या लहान मुलांनी तसे म्हणण्यास परवानगी देऊ नये असा विचार ते करू लागले, म्हणून त्यांनी त्याला विचारले, तुम्ही ह्याला कशी काय परवानगी देऊ शकता? ही मुले काय घोषणा देत आहेत हे तुम्ही ऐकले का?” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “होय, मी त्यांना ऐकले आहे, परंतु ‘मुले माझी स्तुती करतील’ हे लहान मुलांबद्दल असलेले हे शास्त्रवचन तुम्ही वाचले आहे आणि ते जर तुम्हांला आठवत असेल, तर तुम्हांला हे कळेल की देव त्यांच्याबरोबर संतुष्ट आहे,” स्तोत्रकर्ता, देव काय म्हणतो ते लिहितो, ‘तू बालके व तान्हुली यांच्या मुखातून स्तुती पूर्ण करवली आहे.’”

17 नंतर येशूने ते शहर सोडले. शिष्य त्याच्याबरोबर बेथानी या गावी गेले, आणि ते त्या रात्री तेथेच राहिले.
अंजीराचे निष्फळ झाड

18 दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे ते शहराकडे पुन्हा येत असता, तेव्हा येशूला भूक लागली. 19 रस्त्याच्या कडेला त्याने अंजिराचे एक झाड पाहिले, काही अंजीर तोडून खावे म्हणून तो अंजिराच्या झाडापाशी गेला. पण तो जवळ गेला, तेव्हा त्या झाडावर अंजीर नाहीत तर केवळ पाने आहेत असे त्यांनी पाहिले. मग तो त्या अंजिराच्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला, कधीही अंजीर न येवो!” परिणामी, ते अंजिराचे झाड लगेच वाळायला सुरू झाले.

20 शिष्यांनी दुसऱ्या दिवशी पाहिले, तेव्हा ते अंजिराचे झाड पूर्णपणे वाळून गेले होते. त्यांना फार आश्चर्य वाटले आणि ते येशूला म्हणाले, “अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून गेले ह्यामुळे आम्ही फार आश्चर्यचकित झालो आहोत!” 21 येशू त्यांना म्हणाला, “याचा विचार करा: तुम्ही जे काही त्याला मागीतले आहे ते करण्यास देव समर्थ आहे असा विश्वास तुम्ही संशय न करता धरला, तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तसेच यासारख्या गोष्टी करण्यास तुम्ही सक्षम व्हाल. तसेच तेथे असलेल्या डोंगराला ‘स्वतःला उपट आणि स्वतःला समुद्रात फेकून दे,’ असे त्याला म्हणालात तर ते घडेल! असे अद्भुत कृत्ये तुम्ही देखील करू शकाल. 22 त्या व्यतिरिक्त, तुम्ही जेव्हाकधी देवाला प्रार्थना करून काही गोष्टी तुम्ही मागता, तेव्हा तो तुम्हांला देईल असा विश्वास तुम्ही धरला, तर त्याच्याकडून तुम्हांला प्राप्त होईल.”
येशूच्या अधिकाराविषयीचा प्रश्न

23 त्यानंतर, येशूने मंदिराच्या अंगणात प्रवेश केला. तो लोकांना शिकवत असतांना, मुख्य याजक व लोकांचे वडीलजण येशूकडे आले. ते म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? काल तुम्ही येथे जे केले हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?” 24 येशू त्यांना म्हणाला, “मीसुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारतो, आणि तुम्ही मला उत्तर दिले, तर कोणी या गोष्टी करण्यासाठी मला अधिकार दिला आहे, हे मी तुम्हांला सांगेन.

25 बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने त्याच्या जवळ आलेल्यांना बाप्तिस्मा दिला हा अधिकार त्याला कोठून मिळाला? देवाकडून किंवा लोकांकडून त्याला तो मिळाला का?’ मुख्य याजक आणि वडीलजण यांनी काय उत्तर दिले पाहिजे याविषयी आप-आपसांत चर्चा केली. ते एकमेकांना म्हणाले, “हे देवापासून आहे, असे आम्ही म्हणालो, तर तो आम्हांला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्या संदेशावर विश्वास ठेवायला पाहिजे!’ 26 ‘पंरतु हे मनुष्यापासून आहे,’ असे आम्ही म्हणालो, तर लोक आपल्या विरुद्ध अतिक्रूर प्रतिक्रिया दाखवू शकतात कारण सर्व लोक विश्वास करतात की योहान हा देवाने पाठविलेला एक संदेष्टा होता. 27 म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “योहानाला हा अधिकार कोठून मिळाला हे आम्हांला माहित नाही.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, कारण तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही, म्हणून काल जे काही मी केले त्या गोष्टी करण्याची परवानगी मला कोणी दिली? हे मी तुम्हांला सांगणार नाही.”
दोन पुत्राचा दुष्टांत

28 मग येशू मुख्य याजक व वडीलजणांना म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो त्याबद्दल तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुले होती, तो आपल्या मोठ्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षमळ्यात जा आणि काम कर!’ 29 पंरतु मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला, ‘मी जाणार नाही!’ परंतु नंतर त्या मुलाने आपले मन बदलले व तो द्राक्षमळ्यात गेला आणि काम केले. 30 नंतर वडील आपल्या लहान मुलाकडे गेले आणि त्यांनी त्याच्या मोठ्या मुलाला सांगितलेले ते त्याला सांगितले, तो मुलगा म्हणाला, ‘हो महाशय, मी आज जाईन आणि द्राक्षमळ्यात काम करीन. पंरतु तो तिथे गेला नाही.

31 मग त्याच्या दोन मुलांपैकी कोणत्या मुलाने त्याच्या वडिलांना जे काही हवे ते केले?” त्यांनी उत्तर दिले, “मोठ्या मुलाने”. मग येशू त्यांना म्हणाला, तर याचा विचार करा: जकातदार व वेश्या यांसह इतर लोक, यांना तुम्ही म्हणता की ते फार पापी आहेत-तो तुम्हांवर राज्य करण्यास सहमत होण्याऐवजी त्याच्यांवर राज्य करण्यास सहमत होण्याची दाट शक्यता आहे. 32 मी तुम्हांला हे सांगतो कारण, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने देखील योग्य मार्गाने कसे जगावे हे स्पष्ट सांगितले, पंरतु तुम्ही त्याच्या उपदेशावर विश्वास ठेवला नाही. पंरतु जकातदार आणि वेश्या यांनी त्याच्या उपदेशावर विश्वास ठेवला, आणि ते आपल्या पापी वर्तनापासून दूर वळाले. याउलट, त्याच्यांत बदल झाला आहे असे पाहून देखील तुम्ही पाप करणे थांबविण्यास नकार दिला आणि योहानाच्या उपदेशावर विश्वास ठेवला नाही.”
द्राक्षमळ्याचा दुष्टांत

33 “मी तुम्हांला आणखी दुसरी बोधकथा सांगतो तिला ऐका, एक जमीन मालकाने एक द्राक्षमळा लावला. त्याने त्याच्या सभोवती एक कुंपण बांधले. द्राक्षातून बाहेर येणारा रस गोळा करण्यासाठी एक जागा त्याने बनविली. त्याने एक मनोरा देखील बांधिला यासाठी की त्यामध्ये कोणीतरी बसून त्या द्राक्षमळ्याची रखवाली करू शकेल. त्याने काही लोकांना द्राक्षमळा भाड्याने दिला जे त्याची काळजी घेतील आणि त्याला काही द्राक्षे परत देतील. मग तो दुसऱ्या देशी निघून गेला. 34 द्राक्षे तोडण्याचा हंगाम आला, तेव्हा त्या जमीनमालकाने आपल्या काही चाकरांना द्राक्षमळ्याची काळजी घेणाऱ्या मनुष्याकडे द्राक्षमळ्यात उत्पन्न झालेला द्राक्षांचा वाटा उचलण्यासाठी पाठवले. 35 परंतु त्या भाडेकरूंनी चाकरांना बांधून टाकले, त्यांनी त्याच्यापैकी एकाला मार दिला, तर दुसऱ्यास जीवे मारले, आणि तिसऱ्या एकाला त्यावर धोंडमार करून ठार केले. 36 म्हणून त्या जमीन मालकाने पहिल्या वेळेस पाठवले होते त्यापेक्षा आधिक चाकरांना पाठवले. पण त्या भाडेकरूंनी इतर चाकरांना वागणूक दिली होती त्यासारखीच वागणूक ह्या इतर चाकरांनाही दिली. 37 याबद्दल त्याने ऐकल्यानंतर, जमीनमालकाने आपल्या स्वतःच्या मुलाला भाडेकरूपासून द्राक्षांचा वाटा मिळवण्यासाठी पाठवले. त्याने त्याला पाठवले तेव्हा तो स्वतःशी म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील आणि माझा द्राक्षांचा वाटा त्याला देतील.’

38 पण शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला येतांना पाहिले तेव्हा ते एकमेकांस म्हणू लागले, ‘हा मनुष्य तर ह्या द्राक्षमळ्याचा वारस आहे! चला आपण एकत्र होऊ आणि त्याला ठार करू व त्याचे वतन घेऊन आप-आंपसात वाटणी करू.’ 39 म्हणून त्यांनी त्याला धरले, द्राक्षमळ्याच्या बाहेर त्याला फेकले आणि त्याला ठार मारले.

40 आता मी तुम्हांला विचारतो, जमीनमालक आपल्या द्राक्षमळ्यास परत येईल तेव्हा या भाडेकरून सोबत तो काय करील असे तुम्हांला वाटते?” 41 यहूदी मुख्य याजक आणि वडीलजणांनी उत्तर दिले, तो त्या दुष्ट माणसांचा समूळपणे नाश करील! मग त्या द्राक्षमळ्याला तो इतरांना भाड्याने देईल. ते द्राक्षे कापणी करतील तेव्हा ते त्याचा वाटा देतील.”

42 येशू त्यांना म्हणाला, “हे योग्य आहे, म्हणून तुम्ही शास्त्रवचनांतील वाचलेल्या या शब्दांचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहेः
इमारती बांधणांऱ्या मनुष्याने एका मोठ्या इमारतीच्या एका विशिष्ट दगडाला नाकारले. परंतु त्याच दगडाला इतरांनी त्याच्या योग्य ठिकाणी ठेवले, आणि तो इमारतीचा सर्वात महत्वाचा दगड झाला. हे प्रभूने केले आहे, आणि आम्ही त्याच्याकडे पाहतो तेव्हा आश्चर्यचकित होतो.’

43 तुम्ही मला नाकारिले म्हणून, मी तुम्हांला हे सांगणार आहे: देव ज्या तुम्हा यहूदी लोकांवर राज्य करायचा पण आता तो करणार नाही. त्याऊलट, परराष्ट्रीयांवर, आणि तो जे करायला सांगतो ते करणांऱ्यावर तो राज्य करण्यास सहमत होईल. 44 जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील आणि हा दगड कोणावर पडेल तर त्याचा भुगाभुगा होईल.

45 मुख्य याजकांनी आणि वडीलजण असलेले परुश्यांनी ही बोधकथा ऐकली, तेव्हा तो ख्रिस्त आहे ह्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही म्हणून तो त्यांच्यावर आरोप ठेवत होता हे त्यांच्या लक्षात आले. 46 त्याला धरून अटक करण्याची त्यांची इच्छा होती, परंतु त्यांनी तसे केले नाही कारण त्यांनी हे केले तर गर्दी काय करेल ह्याची त्यांना भीती होती कारण लोकसमुदाय येशूला संदेष्टा म्हणून मानीत होते.